लंडनला निघाला अन् युद्धाच्या कचाट्यात सापडला
विशाखा सुभेदारने सोशल मीडियावर एक अतिशय भावूक व्हिडिओ शेअर करत आपल्या मुलाची परिस्थिती जगासमोर मांडली आहे. तिचा मुलगा लंडनला जाण्यासाठी निघाला होता. प्रवासात ले-ओव्हरमुळे त्याचे विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आले. मात्र, अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने तिथली सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली.
विशाखा सांगते, "माझा मुलगा गेल्या ४ दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. एअरलाइन्सने त्याला एका हॉटेलमध्ये ठेवलं आहे खरं, पण तिथली परिस्थिती आता गंभीर होत चालली आहे. तो स्वतः तिथे भीतीदायक अनुभव घेतोय. जसं दुबईतील भारतीयांना मायदेशी आणलं जातंय, तसंच कुवेतमध्ये अडकलेल्या माझ्या मुलाला आणि इतर भारतीयांनाही सरकारने परत आणावं, ही माझी कळकळीची विनंती आहे."
advertisement
महाराष्ट्र सरकार धावलं मदतीला
विशाखाचा हा टाहो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने हालचाली करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री कार्यालयातून (CMO) विशाखाला फोन करून तिच्या मुलाचा सर्व तपशील घेण्यात आला आहे. राज्य सरकार आता हे तपशील परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवणार असून, कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधत आहे. फडणवीस यांच्या या तत्परतेमुळे विशाखाला थोडासा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विशाखासोबत संपर्क साधत तिला धीर दिला आहे.
दुबईतही भारतीय ताऱ्यांची धाकधूक
केवळ विशाखाचा मुलगाच नाही, तर दुबईतही अनेक भारतीय सेलिब्रिटी सध्या एअरस्पेस बंद झाल्यामुळे अडकून पडले आहेत. ईशा गुप्ता आणि सोनल चौहान यांनी थेट सोशल मीडियावरून मदतीची अपील केली आहे. साऊथ सुपरस्टार अजित कुमारच्या सुरक्षेसाठी तमिळ चाहते प्रार्थना करत आहेत. विष्णु मंचू आणि एरिका फर्नांडिसही तिथल्या बिघडत्या वातावरणाचे अपडेट्स देत आहेत. रोशेल राव आणि कीथ सेक्वेरा हे जोडपं आपल्या लहान मुलीसह दुबईत अडकलं आहे.
