मुंबई: बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन जबरदस्त गाजला. यातल्या काही सदस्यांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. वर्षा उसगांवकर त्यापैकीच एक. बोलके डोळे, आकर्षक रूप आणि सुरेख अभिनयाच्या जोरावर त्यांनी ऐशी, नव्वदचा काळ गाजवलाच, परंतु आजही त्यांचा करिश्मा कमी झालेला नाही. बिग बॉसमुळे त्या माणूस म्हणून कशा आहेत हे प्रेक्षकांना कळलं.
advertisement
खेळाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच वर्षा उसगांवकरांचा संयमी स्वभाव पाहायला मिळाला. शिवाय त्यांचं मराठी भाषेवरील प्रभुत्त्वही प्रेक्षकांना विशेष रुचलं. त्या मूळ गोव्याच्या मग इतकं अस्खलित मराठी कसं बोलतात, असा प्रेक्षकांना प्रश्नच पडला. त्यावर घराबाहेर पडल्यानंतर वर्षाताईंनी उत्तर दिलं.
'लोकल 18'ने वर्षाताईंशी संवाद साधला. तेव्हा मराठी भाषेवर एवढं प्रभुत्त्व कसं? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं, 'वाचन आणि मराठी भाषेवरील माझं प्रेम. जिव्हाळा असावा लागतो. मराठी भाषा मला आपली, स्वत:ची म्हणजे माझी वाटते. माझी माय वाटते. माय मराठी आपण म्हणतो. त्यामुळे माझं प्रस्थान तिथून व्हावं आणि त्याचवेळेला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, याच्यासारखी चांगली बातमी नाही.'
पुढे त्यांनी सांगितलं, 'मराठीवरील प्रभुत्त्वाचं श्रेय मी माझ्या वडिलांना देते, कारण त्यांनी इयत्ता पहिली ते चौथी आम्हा तिन्ही बहिणींना मराठीतून शिकवलं, ज्यात एकही इंग्रजी विषय नव्हता. माझी आई मराठी एम.ए. आहे. त्यामुळे ती सतत मला मराठी भाषेबद्दल सांगायची. तिने आवड निर्माण केली आणि मी खूप साहित्य वाचन केलं आहे. कवितांची आवड लावून घेतली. मराठी गाणी अगदी आत्मियतेने रेडिओवर ऐकली आहेत. मला वाटतं हे सगळं मिळून माझा मराठीचा चांगला अभ्यास झाला.'
दरम्यान, बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन कोण जिंकणार, असं विचारलं असता 'ते सांगू शकत नाही, प्रेक्षकांवर अवलंबून आहे', असं वर्षाताई म्हणाल्या. तसंच 'बिग बॉसमध्ये प्रत्येकाने एकदातरी जायला हवं, स्वत:चं अवलोकन करण्यासाठी', असंही त्यांनी सांगितलं.