मानवी तस्करी प्रकरणात अभिनेता मनीष ग्रेबला त्याच्या वडाळा येथील घरातून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबरच त्याच्या 4 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक चीनी नागरिक आहे. याच रॅकेटनं तब्बल 60 तरुणांना बनावट नोकरीच्या आमिषाने फसवून म्यानमारमध्ये पाठवले होते. या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली असून ते आता मुंबईकडे परत येत आहेत.
advertisement
बनावट नोकऱ्यांचं आमिष, सायबर गुलामगिरीचा फास
या प्रकरणात उघड झालं की मनीष ग्रे उर्फ मॅडी आणि त्याच्या टोळीने सोशल मीडियावरून संपर्क साधून थायलंडमध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्यांचं आमिष दिलं. त्यानंतर या तरुणांना बेकायदेशीररित्या बोटीने म्यानमारच्या मियावाडी भागात नेण्यात आलं. तिथे सायबर फसवणुकीत भाग घेण्यास भाग पाडण्यात आलं. त्यांच्याकडून खंडणी, डिजिटल फ्रॉड यांसारख्या गुन्ह्यांचं काम करून घेतलं जात होतं.
पासपोर्ट जप्त, मारहाण आणि धमक्या
सुटलेल्यांपैकी एका पीडितानं सांगितलं की, एजंटांनी त्यांचे पासपोर्ट काढून घेतले आणि मारहाण केली. जर ते नियम पाळले नाहीत तर अवयव काढून टाकण्याची धमकी दिली. त्यांना DBL नावाच्या एका चीनी कंपनीत काम करत असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात ते AK-47 रायफलधारी बंडखोरांच्या ताब्यात होते.
आरोपींची ओळख
तैसन उर्फ आदित्य रवी चंद्रन, रूपनारायण गुप्ता, जेन्सी राणी, तलानीती नुलाक्सी (चिनी नागरिक, कझाकस्तान वंश) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
सुटका आणि गुन्हा उघडकीस
या टोळीविरोधात 20 तरुणांनी भारतात परतल्यानंतर तक्रारी दाखल केल्या. यानंतर सतीश शर्मा (अंधेरी पूर्व) यांच्या तक्रारीवरून कारवाई सुरू झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक पीडिताला 5000 अमेरिकन डॉलर्सला विकण्यात आलं होतं.
सरकारी यंत्रणांनी घेतली सक्रिय भूमिका
या गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र नोडल सायबर पोलिस, परराष्ट्र मंत्रालय, आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आला. अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव यांनी सांगितलं की या प्रकरणात अनेक तरुणांचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला आहे.
