धावत्या लोकलमधून पडून दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, घडलेला हा अपघात कळवा-मुंब्रा डाउन स्लो मार्गावर झालेला आहेत. ज्यात सिराज मुस्तकीम खान (राहणारा कल्याण) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मित्रासोबतचा शेवटचा प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, सिराज हा लोकलच्या दरवाजात उभा राहून प्रवास करत होता. ट्रेन वेगात असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेच्या वेळी त्याच्यासोबत त्याचा मित्रही प्रवास करत होता.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या सिराजला त्वरित सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
दरवाजात उभे राहून प्रवास करताना तोल गेल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून नागरिकांनी लोकलमध्ये सुरक्षितपणे प्रवास करावा असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
