Shiv Jayanti 2026: छत्रपती शिवरायांचं मूळ गाव असलेलं संभाजीनगरमधील हे ठिकाण, ‘ती’ गढी आजही देतेय इतिहासाची साक्ष, Video
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Shiv Jayanti 2026: मालोजी राजे यांचे पुत्र शहाजीराजे यांचा जन्म देखील वेरूळ येथे झाल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी शहाजीराजांची काही पत्रे देखील आहेत.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानलं जातं. 19 फेब्रुवारी ही जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. छ. संभाजीनगरमधील वेरुळ हे ठिकाण भोसले घराण्याचे मूळगाव म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची येथे गढी आहे. मालोजीराजे यांचे वडील म्हणजे बाबाजी राजे हे त्यांच्या आई समवेत पंधराव्या शतकात या ठिकाणी आले. बाबाजी राजेंकडे वेरूळसह बऱ्याच गावांची पाटीलकी असल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात. याबद्दलच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
वेरूळ येथे बाबाजीराजे भोसले स्थायिक झाल्यानंतर त्यांचे लग्न रेखाआऊसाहेब यांच्यासोबत झाले. रेखाआऊसाहेबांपासून त्यांना मालोजी आणि विठोजी हे दोन पुत्र झाले. मालोजी राजेंच्या धार्मिक कार्याचा उल्लेख 91 कलमी बखरीत घृष्णेश्वराचे मंदिर त्यांनी बांधले आहे, असा उल्लेख आढळून येतो. मालोजी राजे भोसले, विठोजीराजे भोसले, उमाऊ आईसाहेब, दीपाबाई यांचे वास्तव्य वेरूळला होते, असे इतिहास अभ्यासक योगेश जोशी सांगतात.
advertisement
निजामशाही मध्ये मालोजी राजेंकडे मनसबदारी होती, हळूहळू ती मनसबदारी वाढत गेली. तसेच कोल्हापूरमध्ये त्यांनी आदिलशाही सरदारांचा पराभव केल्याचा उल्लेख या ठिकाणी सापडतो. तसेच इतर लढायांमध्ये देखील त्यांनी आपली कर्तबगारी दाखवली. स्वकर्तृत्वावर धन अर्जित केले. 91 कलमी बखरीमध्ये उल्लेख आहे की, त्यांना वाड्याचे खनन करताना या ठिकाणी सुवर्ण मोहरांचा हंडा सापडला. पण त्यांचे ते जमा केलेले धन असावे, आणि त्या धनातून त्यांनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. याबरोबरच सातारा जिल्ह्यातल्या शिखर शिंगणापूर येथे तलाव बांधला, असे जोशी यांनी सांगितले.
advertisement
उमाऊ आईसाहेबांनी टिमानभट व दामोदरभट यांना अभिषेकासाठी अधिकार दिले. तसेच घृष्णेश्वर मंदिरात शिलालेख आढळतो त्या शिलालेखावर मालोजी राजेंनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे, असा उल्लेख असल्याचंही इतिहास अभ्यासक जोशी सांगतात.
छत्रपती शिवाजी महाराज मूळ वेरूळचे...
बाबाजी राजे भोसले हे वेरूळ येथे स्थायिक झाले, त्यानंतर त्यांचे दोन्ही पुत्र मालोजीराजे व विठोजीराजे वेरुळलाच राहिले. मालोजी राजे यांचे पुत्र शहाजीराजे यांचा जन्म देखील वेरूळ येथे झाल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी शहाजीराजांची काही पत्रे देखील आहेत. पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांना वडील शहाजीराजे व आई जिजाऊ यांनी घडवलं, त्याची पाळेमुळे वेरुळच्या याच मातीत असल्याचे दिसते, असंही जोशी सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 8:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Shiv Jayanti 2026: छत्रपती शिवरायांचं मूळ गाव असलेलं संभाजीनगरमधील हे ठिकाण, ‘ती’ गढी आजही देतेय इतिहासाची साक्ष, Video









