तरुणींना फसवणारा ठाण्याचा ‘रील स्टार’
मिळालेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामवर रिल स्टार म्हणून ओळख निर्माण केलेल्या तरुणाचे नाव शैलेश रामुगडे आहे. सोशल मीडियावर ऐशो आरामाचे जीवन जगत असल्याचे दाखवणारा हा तरुण प्रत्यक्षात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा आणि त्यांच्याकडून दागिने, पैसे आणि महागड्या वस्तू उकळण्याचे धंदे करत होता.
'हा' प्रकार कसा झाला उघडकीस
advertisement
घडले असे की, डोंबिवलीतील एका उच्चभ्रू घरातील मुलीचे लाखो रुपयांचे दागिने अचानक गायब झाले. कुटुंबीयांनी चौकशी सुरू केली तेव्हा समजले की, तरुणीने तिच्या प्रियकरावर विश्वास ठेवून घरातील सर्व दागिने त्याला दिले होते. हा प्रियकर म्हणजे प्रसिद्ध रीलस्टार शैलेश रामूगडेच होय. त्याने दोन वेबसीरीजमध्ये काम केल्याचा दावा करीत स्वतःला मोठा कलाकार म्हणून दाखवले होते. पण प्रत्यक्षात तो केवळ तरुणींना जाळ्यात ओढण्याचा मास्टरमाइंड निघाला
आधीच फसवणूकीचे गुन्हे दाखल
कापूरबावडी पोलीस ठाण्यात शैलेशविरुद्ध आधीच दोन तरुणींची फसवणूक केल्याची नोंद होती. हे कळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक राम चोपडे आणि निरीक्षक गमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात उघड झाले की, शैलेशने फक्त एक-दोन नव्हे तर डोंबिवली आणि ठाणे परिसरातील अनेक तरुणींना प्रेमाचा सापळा लावून लुटले होते.
शेवटी पोलिसांनी ठाण्यातील हिरानंदानीमधील त्याच्या आलिशान फ्लॅटवर छापा टाकून शैलेशला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 37 लाखांचे दागिने तर जवळपास एक कोटी रुपये किमतीची बीएसडब्लू कार तसेच चार महागडे आयफोन जप्त करण्यात आले. हे सर्व सामान तरुणींनी त्याला दिलेलं होतं.
सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमो यांच्या मते, या प्रकरणात आणखी पीडित मुली पुढे येण्याची शक्यता आहे. डोंबिवलीत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सोशल मीडियावर गाजणाऱ्या या रिल स्टारचा खरा चेहरा आता उघड झाला आहे.
