महिलेकडे आले भामटे अन् जे घडलं ते...
सत्यवती पालाटी असे या फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून त्या कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रस्ता परिसरात कुटुंबीयांसह राहतात. खासगी नोकरी करणाऱ्या सत्यवती बुधवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास काटेमानिवली भागातील बंद असलेल्या महा ई-सेवा केंद्राजवळून पायी जात होत्या. त्याचवेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांचा पाठलाग करत अचानक आडवा रस्ता अडवला.
advertisement
हिंदी भाषेत संभाषण करत या भामट्यांनी महिलेला थांबवले आणि परिसरात एक मारवाडी व्यक्ती स्वखुशीने ज्येष्ठ नागरिकांना साड्या आणि किराणा वाटप करत असल्याचा बनाव रचला. तुम्ही गरीब दिसायला हव्यात, त्यामुळे गळ्यातील सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवा, अन्यथा तुम्हाला मदत मिळणार नाही,असे सांगत त्यांनी महिलेला गोंधळात टाकले.
या गडबडीत भामट्यांनी हातचलाखी करत सत्यवती यांच्या गळ्यातील सुमारे 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. दागिने महिलेला परत देत असल्याचा देखावा करत त्यांनी ते स्वतःच्या ताब्यात ठेवले. काही अंतरावर नेऊन दोघेही अचानक पळून गेले. काही वेळातच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सत्यवती यांनी आरडाओरड करत परिसरात शोध घेतला, मात्र तोपर्यंत भामटे पसार झाले होते. या गंभीर लूटप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
