फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्याचे सोपे उपाय:
1) जास्त पाणी प्या:
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवायची असेल तर शरीर हायड्रेट ठेवण्याची गरज आहे. हिवाळ्यात थंडीमुळे रक्तवाहिन्या आधीच आकुंचन पावलेल्या असतात. त्यामुळे रक्ताभिसरणाला अडथळा निर्माण होतो. याशिवाय प्रदूषणामुळे शरीरात प्रवेश करणारे सूक्ष्मजीव श्लेष्मा म्हणजेच कफ तयार करतात. जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा, फुफ्फुसं हा कफ घशाद्वारे शरीराबाहेर काढून टाकतात. याशिवाय रक्तभिसरणही नीट व्हायला मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात तुम्हाला तहान जरी नसेल लागली तरी ठराविक अंतराने पाणी पित राहिल्याने शरीराला फायदा होतो.
advertisement
2) प्रदूषण टाळा:
प्रदूषणाचा सर्वात वाईट परिणाम हा फुफ्फुसांवर होतो. त्यामुळे ज्या भागात जास्त प्रदूषण आहे अशा ठिकाणी जाणं टाळा. कारण प्रदूषणामुळे धूर आणि प्रदूषकांचा तुमच्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होण्याची भीती असते. जर तुम्ही बाहेर पडणं टाळू शकत नसाल तर मास्कचा वापर करा. तुम्ही ज्या भागात राहाता तिथे जर जास्त प्रदूषण असेल तर घरात एअर प्युरिफायरचा वापर करा.
3) धुम्रपान आणि अल्कोहोल :
प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही धुम्रपान आणि मद्यपान सोडणं सर्वात महत्त्वाचं आहे. धूम्रपानामुळे फुफ्फुसांची हानी होऊन कर्करोगाचा धोका संभावतो. अल्कोहोल देखील फुफ्फुसासाठी हानिकारक आहे. त्यामुळे हिवाळ्यात या गोष्टींपासून दूर राहिल्यास तुमची फुफ्फुसं मजबूत राहतील.
4) व्यायाम :
व्यायामाने शरीर स्वस्थ आणि निरोगी राहायला मदत होते. व्यायाम केल्यामुळे हृदय आणि फुफ्फुसांच्या कार्यक्षमेत सुधारणा होते. मात्र जास्त प्रदूषण, जास्त थंडी असेल तर घराबाहेर जाऊन व्यायाम करण्यापेक्षा घरीच हलका व्यायाम करा. योगाचे काही प्रकार देखील फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायद्याचे मानले जातात.
5) निरोगी आहार:
फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी सात्विक आणि पोषक आहार घेण्याची गरज आहे. जंकफूड टाळून अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं आणि खनिजांनी समृद्ध असा आहार घेतल्यास तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढेल. ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य, सुका मेवा इत्यादींचं रोज सेवन केल्याने फक्त फुफ्फुसांसाठीच नाही तर एकूण आरोग्याला फायदा होतो.
