पुणे : नवरात्री, दसऱ्यानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहे. आता अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटल्यावर पणती, आकाश कंदीलला मोठी मागणी असते. पुण्यातील सुमारे 500 वर्षांचा इतिहास असलेल्या कुंभारवाड्यात अनेक कारागीरांची पणत्या विक्रीची मोठी तयारी सुरू आहे. तर यंदाच्या वर्षी नवीन कुठल्या पणत्या पाहायला मिळतायेत, तसेच कशाप्रकारे ही तयारी सुरू आहे, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
पुण्यातील विश्वास वाघोलीकर यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी गेली 25 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे. कुंभकला नावाने त्याच कुंभार वाड्यात माझे दुकान आहे आणि इथे विविध प्रकारच्या पणत्या पाहायला मिळतात. तर काही पणत्या या नाशिक, गुजरात, कोलकाता या ठिकाणाहूनही इथे येतात. याठिकाणी जवळपास 100 ते 125 प्रकारच्या पणत्या पाहायला मिळतात. यामध्ये प्लेन पणत्या, वेगवेगळ्या डिझाईन केलेल्या, सोनेरी रंगाच्या पणत्या दिसतात.
आता जास्त प्रमाणात माती मिळत नसल्यामुळे हा माल बाहेरुन येतो. तर या व्यवसायाच्या माध्यमातून साधारण 10 ते 20 टक्के नफा होतो. याठिकाणी अगदी 20 रुपये डझन पणत्या मिळतात. त्यामुळे ग्राहक येथून दिवाळीसाठी पणत्या खरेदी करू शकतात, अशी माहिती विक्रेते विश्वास वाघोलीकर यांनी दिली.
दरम्यान, अगदी कमी किमतीत व वेगळ्या प्रकारच्या पणत्याया इथे पाहायला मिळत असल्याने नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याचे दिसत आहे. तुम्हालाही जर स्वस्त दरात पणत्या हव्या असतील तर तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.