एका अहवालानुसार, जेव्हा आपण तणावात असतो किंवा मन निराश असतं किंवा सततच्या कामाच्या व्यापामुळे आपलं शरीर आणि मन हे दोन्हीही थकलेलं असतं तेव्हा आपला मेंदू आपल्याला गोड खाण्याचा संकेत देतो. किंबहुना असंही म्हटलं जातं की तणाव दूर करण्यासाठी काहीतरी गोड खाणं फायद्याचं आहे. गोड पदार्थ किंवा साखर खाल्ल्यामुळे आपल्या मेंदूतून डोपामाईन नावाचं रसायन बाहेर पडतं, ज्यामुळे नैराश्येचं मळभ दूर होऊन आपल्याला आनंद होतो आणि आपला मूड चांगला होतो. त्यामुळे अनेकांना मूड चांगला करण्यासाठी गोड खाण्याची सवय लागते. जी भविष्यात धोक्याची ठरू शकते. त्यामुळे तुम्हालाही अशी गोड खाण्याची सवय लागली असेल, तर हे 6 सोपे पर्याय वापरून पाहा. तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकेल.
advertisement
1) पर्याय निवडा : जर तुम्हाला सतत गोड काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल त्या पदार्थात साखरेचं प्रमाण जास्त असेल तर त्या पदार्थांना पूरक पर्याय निवडा. उदा. जर तुम्हाला खीर, बासुंदी किंवा चॉकलेट खाण्याची इच्छा होत असेल तर त्याऐवजी फळं, सुकामेवा, गुळ किंवा मधाचं सेवन करा. म्हणजे तुमची गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहू शकतं.
2) प्रथिनंयुक्त आहार घ्या : तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल तर समजून जा की, तुमच्या शरीरात प्रथिनांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे तुम्ही आहारात प्रथिनंयुक्त पदार्थ जसं की, अंडी, दूध, पनीर, डाळी, काजू याचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा आपसूकच कमी होईल. याशिवाय प्रथिनांमुळे तुमचं पोटही दीर्घकाळ भरलेलं राहील ज्याचा फायदा तुम्हाला वजनही नियंत्रणात ठेवण्यासाठी होऊ शकेल.
हे सुद्धा वाचा : वजन कमी करायचं आहे पण, जंक फूड खाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही? फॉलो करा या टिप्स
3) जास्त पाणी प्या : जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते तेव्हा आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते. त्यामुळे तुम्ही ठराविक अंतराने पाणी पित राहा जेणेकरून तुमची गोड खाण्याची इच्छा मरू शकते. याशिवाय जेव्हा जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा तेव्हा पहिल्यांदा 1 ते 2 ग्लास पाणी प्या. तुमची गोड खाण्याची इच्छा मरून जाईल.
4) जंक फूड / प्रक्रिया केलेले अन्न खाणं टाळा : बाजारात उपलब्ध असलेलं पॅकेज्ड फूड आणि जंकफूड खाणं टाळा. कारण यात साखरेचं प्रमाण अधिक असतं. कोल्ड्रिंक्स, बिस्किटं आणि केकमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे आपली गोड खाण्याची इच्छा जास्त वाढते. त्यामुळे अशा गोड गोष्टींपासून दूर राहाण्याचा प्रयत्न करा.
5) चांगली झोप घ्या : अपुऱ्या झोपेमुळे आपल्या शरीरात घ्रेलिन नावाच्या हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे गोड खाण्याची इच्छा वाढते. म्हणून, दररोज किमान ७-८ तास चांगली झोप घ्या. जेणेकरून तुम्ही गोड खाण्याची इच्छा आपसूकच कमी करू शकाल.
6) साखरेचं प्रमाण हळूहळू कमी करा : जर तुम्ही चहा किंवा कॉफीमध्ये 2 चमचे साखर टाकत असाल तर ती लगेच बंद करण्याऐवजी हळूहळू साखर खाण्याचं प्रमाण कमी करा. साखर बंद केल्यानंतरही तुम्हाला चहा किंवा कॉफी गोड हवी असेल तर त्यात गुळ किंवा मधाचा वापर करा. त्यामुळे तुम्ही साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण मिळवू शकता.
याशिवाय तुम्हाला जेव्हा जेव्हा गोड खाण्याची इच्छा होत असेल डार्क चॉकलेट, सुकामेवा, ग्रीन टी, दही किंवा केळी, सफरचंद अशी फळं खाऊन पाहा. यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि तुमच्या आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.
मात्र इतकं सगळं करूनही तुमची गोड खायची इच्छा कमी होत असेल तर तुम्हाला निद्रानाश किंवा हार्मोन्सच्या असंतुलनाचा त्रास असू शकतो. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.