अळू अनेकांना आवडतं. शहरात विकत अळू मिळतं. पण गावावरून लोक आले की भरमसाठ अळू घेऊन येतात. त्याचं फदफदं झालं, वडी झाली... पण ते खाऊन आता कंटाळा आला आहे. पण अळूची पानं उरलीत त्याचं आता काय करायचं? तर अळूची ही नवीन रेसिपी करून पाहा. ज्यात बटाटा टाकून एका वेगळ्या पद्धतीने अळू बनवण्यात आलं आहे.
advertisement
सगळ्यात आधी एक बटाटा घ्या. त्याची साल काढून घ्या, आता हा बटाटा बारीक किसणीवर किसून घ्या. किसलेला बटाटा लगेच पाण्यात टाकून ठेवा जेणेकरून तो काळा पडणार नाही. आता अळूची पानं धुवून घ्या आणि ती चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात मिरच्या, आलं, लसूण, जिरे, धने टाकून थोडं पाणी टाकून वाटून घ्या. थोडं जाडसरच ठेवा
आता एक कढई घ्या, त्यात तेल ओता. तेल तापलं की मोहरी, जिरं टाका. आता वाटलेला मसाला टाका. हा मसाला मिनिटभर तेलात परतून घ्या. थोड्या वेळाने त्याचा छान सुगंध येईल. आता यात चिरलेली अळू टाका आणि नीट मिक्स करून घ्या. आता किसलेला बटाटा टाकून मिक्स करा. आता यात रंगासाठी थोडीशी हळद टाका. पाणी ओता.आता मीठ, ओवा टाकून एक उकळी येऊ द्या. चांगली उकळी आली की त्यात बेसन पीठ टाकून मिक्स करा. गुठळ्या होऊ देऊ नका. तुम्हाला हवं तर तुम्ही यात चिंच, गूळ टाकू शकता.
2 मिनिटं झाकण ठेवा आणि पुन्हा हलवून घ्या. नीट शिजेपर्यंत हीच प्रोसेस करत राहायची आहे. आता एका ताटाला तेल लावून घ्या आणि अळूचं तयार केलेलं मिश्रण या ताटात नीट पसरवून घ्या. त्यावर तीळ पसरवून घ्या. थंड झालं, सुकलं की त्याच्या वड्या कापा. यावर फोडणी टाकून, शॅलो फ्राय किंवा डिप फ्राय करून कसंही करून खाऊ शकता. महिलेने व्हिडीओत कढईत तेल, मोहरी, जिरं, कडीपत्ता यांची फोडणी करून त्यात या वड्या परतून घेतल्या आहेत. रंगासाठी थोडं लाल तिखट टाकलं तरी चालेल.
Kitchen Tips : अंडं फ्रेश आहे की खराब, कसं ओळखायचं? भारतीय शेफने सांगितली सोपी ट्रिक
अळूच्या त्याच त्याच वड्या खाऊन कंटाळा येतो आणि बनवायलाही वेळ लागतो. आता यापद्धतीने झटपट अळूच्या वड्या नवीन पद्धतीने बनवून पाहा. बटाट्यामुळे या वड्यांना खूप छान चव येते, असं या महिलेने सांगितलं आहे. @Sitachaswayampak या युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही रेसिपी करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
