'हर घर तिरंगा' अभियानाचा कालावधी
दरवर्षी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान देशभरात हे अभियान राबवले जाते. या काळात शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, विविध संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांची घरे, दुकाने, कार्यालये यावर तिरंगा फडकवला जातो. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने ध्वज स्वतः खरेदी करून लावावा, त्याची योग्य काळजी घ्यावी आणि संहितेतील नियमांचे पालन करावे. या उपक्रमामुळे राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान आणि त्याच्याविषयी आदराची भावना अधिक मजबूत होते.
advertisement
ध्वज कोठे खरेदी करावा?
तिरंगा खरेदी करण्यासाठी स्थानिक बाजारपेठ, टपाल कार्यालये, शासकीय मान्यता प्राप्त विक्रेते किंवा ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. मात्र, खरेदी करताना 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स' (BIS) मान्यताप्राप्त ध्वजाचाच स्वीकार करावा. यामुळे ध्वजाचा दर्जा, आकारमान आणि रंगसंगती ही भारतीय मानकांनुसार राहते.
राष्ट्रीय ध्वजाचा अवमान – कायदेशीर कारवाई
राष्ट्रीय सन्मान कायदा, 1971 नुसार ध्वजाचा अपमान करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणात संबंधित व्यक्तीवर तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे ध्वज हाताळताना आणि फडकावताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
तिरंगा फडकवण्याचे आणि उतरवण्याचे नियम
1- ध्वज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच फडकवावा.
2-ध्वज फडकवताना केशरी रंग वर, पांढरा रंग मध्ये आणि हिरवा रंग खाली असावा.
3-ध्वज जमिनीला, पाण्याला किंवा जमिनीवर खेचला जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
4-इतर कोणताही ध्वज, पताका किंवा चिन्ह तिरंग्याच्या वर नसावे.
ध्वजाची घडी घालण्याची योग्य पद्धत कोणती?
१. प्रथम हिरव्या पट्ट्यापासून घडी घ्यावी.
२. त्यावर पांढरा पट्टा आणि शेवटी केशरी पट्टा येईल अशी घडी घ्यावी.
३. शेवटी अशोक चक्र स्पष्टपणे दिसेल, याची खात्री करावी.
ध्वजाची काळजी कशी घ्यावी?
ध्वज अखंड, स्वच्छ आणि फाटलेला नसावा शिवाय ध्वज ज्या दांड्यावर लावला आहे, त्यावर इतर कोणतीही वस्तू, सजावट, जाहिरात किंवा फुलांची तोरणे नसावीत. एवढेच नाही तर ध्वज नेहमी स्वच्छ, कोरड्या आणि सन्माननीय ठिकाणी ठेवावा.
संपूर्ण जबाबदारी आपली
'हर घर तिरंगा'ही केवळ सरकारी मोहीम नाही, तर प्रत्येक भारतीयाचा राष्ट्रीय सन्मान जपण्याचा संकल्प आहे. ध्वज हा आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे आणि त्याचा योग्य सन्मान राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. नियमांचे पालन करून, तिरंग्याचा अभिमानाने स्वीकार करून आणि भावी पिढीला त्याचे महत्त्व पटवून देऊन आपण या अभियानाला खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकतो.