आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या उपयुक्त असतात. हिरव्या बीन्स अर्थात हिरवा घेवडा हा त्यापैकीच एक होय. हा घेवडा अत्यंत पौष्टिक असतो. बहुतांश जण या घेवड्याचा भाजीसाठी किंवा फ्राइड राइसमध्ये वापर करतात. स्ट्रिंग बीन्स, फ्रेंच बीन्स आणि स्नॅप बीन्स अशा बीन्सच्या वेगवेगळ्या जाती आहेत. घेवड्यात व्हिटॅमिन ए, सी आणि के मुबलक प्रमाणात असते. याशिवाय घेवडा फॉलिक अॅसिड आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. हिरवा घेवडा खाल्ल्याने पचनसंस्थेचं आरोग्य चांगलं राहतं. यामुळे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.
advertisement
हिरव्या घेवड्यात व्हिटॅमिन के मुबलक असतं. तसंच हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि कोणत्याही कारणामुळे फ्रॅक्चरची जोखीम कमी होते. हिरवा घेवडा नियमित खाल्ला तर पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. तसंच यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि मुरडा येण्याची समस्या निर्माण होत नाही.
हिरव्या घेवड्यामध्ये कॅरोटिनॉइड्स असतात. हा घटक डोळ्यांसाठी हितावह मानला जातो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी नियमित बीन्स खाणं फायदेशीर आहे. यातलं ल्यूटिन आणि जॅक्सेन्थिन या घटकांमुळे दृष्टी सुधारते. हिरवा घेवडा त्वचा आणि केसांसाठी आरोग्यदायी असतो. यामुळे नखं मजबूत होतात. नियमित घेवड्याचं सेवन केलं तर त्वचा, केसांशी निगडित समस्या उद्भवत नाहीत.
हिरव्या घेवड्यात कॅल्शियम आणि फ्लेवोनॉइड्स मुबलक असतात. फ्लेवोनॉइड्स हे पॉलीफेनोलिक अँटीऑक्सिडंट आहे. हे सामान्यपणे फळं आणि भाजीपाल्यात आढळतं; मात्र हा घटक हिरव्या घेवड्यात मुबलक असतो. त्यामुळे घेवडा खाल्ल्यास हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.