'वेब एमडी'च्या वृत्तानुसार, तुम्ही रोज केवळ एक ते दोन ग्लास जास्त पाणी पिण्यास सुरुवात केली तर तुमचा कॅलरी इनटेक कमी होऊन मेटाबॉलिझमला चालना मिळेल. यामुळे वजन कमी होऊ शकतं. जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पिता, तेव्हा शरीरातल्या कॅलरीज वेगानं बर्न होतात. पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम 30 टक्क्यांपर्यंत वाढतं, यामुळे वजन कमी करण्यास मदत होते, असं अनेक संशोधनातून स्पष्ट झालं आहे. पाणी प्यायल्यावर भूक नियंत्रणात राहते. यामुळे कॅलरी इनटेक कमी होतो. परिणामी वजन कमी करणं सहज शक्य होतं.
advertisement
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिणं उपयुक्त ठरू शकतं. यामुळे जेवण कमी जातं आणि वजन कमी करण्यास मदत होते. तुम्ही वर्कआउट करत असाल, तर पुरेसं पाणी प्यायल्याने तुमची कामगिरी सुधारू शकते. हायड्रेटेड राहिल्याने स्नायूंचं कार्य सुधारतं आणि अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. ज्या व्यक्ती नियमित व्यायाम करतात, त्यांच्यासाठी ही गोष्ट उपयुक्त ठरते. कारण पाणी ऊर्जेची पातळी कायम ठेवतं आणि थकवा कमी करतं.
वजन कमी करण्यासाठी रोज किती पाणी प्यावं, असा प्रश्न विचारला जातो. डॉक्टरांच्या मते, प्रत्येक व्यक्तीचं वय आणि शारीरिक हालचाली वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येकाचं पाणी पिण्याचं प्रमाण वेगवेगळं असते; पण सर्व प्रौढ व्यक्तींनी दिवसभरात किमान दोन ते तीन लिटर पाणी प्यावं. वजन कमी करायचं असेल तर सुमारे एक लिटर पाणी जास्त पिऊ शकता. सोप्या शब्दात सांगायचं झालं, तर दररोज सुमारे चार लिटर पाणी प्यावं. यामुळे फॅट आणि वजन कमी होऊ शकतं.
