अमरावती: प्रत्येक शहराची एक वेगळी खाद्यसंस्कृती असते. तसेच त्या शहरात खवय्यांना भुरळ घालणारी काही ठिकाणं किंवा खाऊ गल्ली असतात. अमरावतीत देखील अशी काही ठिकाणं असून गाडगेनगर चौपाटी हे यापैकी एक आहे. सायंकाळच्या वेळी मोकळ्या हवेत फिरत काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर चौपाटीवरची खाऊगल्ली बेस्ट पर्याय आहे. इथं पाणी पुरी, पाव भाजी, व्हेज पुलाव आणि बरेच चटपटीत पदार्थ खायला मिळतील.
advertisement
अमरावतीतील गाडगेनगर म्हणजे शहराचे हृदय मानले जाते. इथं संत गाडगे महाराज यांचं मोठं मंदिर आहे. येथील पलाश लाईननंतर गाडगेनगर चौपाटी सुरू होते. गाडगेनगर ते राठी नगरपर्यंत ही चौपाटी आहे. सायंकाळी 6 वाजलेनंतर चौपाटीवर खवय्यांची गर्दी बघायला मिळते. इथली शेगाव कचोरी फेमस आहे. तसेच इथला लोणी स्पंज डोसा खाण्यासाठी तर आवर्जून खवय्ये येत असतात.
विदर्भातील फेमस कुरकुरीत बिट्टी, कमी साहित्यात होईल तयार, लगेच नोट करा रेसिपी
गाडगे नगरला आलात की तुम्हाला हवं ते फूड मिळू शकतं. व्हेज पुलाव, चायनिज, मोमोज हे सुद्धा या चौपाटीवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर लस्सी, मावा कुल्फी यासाठी सुद्धा तुम्हाला कुठे दूर जाण्याची गरज नाही. हे सर्व पदार्थ एकाच लाईन मध्ये एकाच रोडला तुम्हाला मिळतील. इथलं भेल भंडार, चाट सेंटर हे सुद्धा प्रसिद्ध आहे.
खवय्यांसाठी खास ऑफर्स
सर्वात महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थावर अनलिमिटेड ऑफर्स सुद्धा दिले जातात. त्यातून सुद्धा तुमचा आणखी फायदा होऊ शकतो. 59 रुपयांत अनलिमिटेड चायनिज पदार्थ त्याचबरोबर 99 रुपयांत अनलिमिटेड पावभाजी असे ऑफर्स सध्या खाऊगल्लीत सुरू आहेत. त्यामुळे अमरावतीला आलात तर याठिकाणी नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
दरम्यान, अमरावतीमध्ये राहणाऱ्या आणि मेसचे जेवण जेवणाऱ्या प्रत्येकांसाठी ही चौपाटी एक आठवण आहे. कारण याठिकाणी टेस्टी आणि गरमागरम पदार्थ मिळतात. प्रत्येक दुकानातील पदार्थाची काही न काही खासियत आहे.