अमरावती - महाराष्ट्राला खूप मोठी खाद्य संस्कृती लाभली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील पदार्थ हे प्रसिद्ध आहेत. तसेच या खाद्यपदार्थांचे विविध असे स्पेशल हॉटेल्स रेस्टॉरंटही पाहायला मिळतात. आज आपण अमरावतीमधील प्रसिद्ध अशा झुणका भाकरीच्या स्टॉलबाबत जाणून घेणार आहोत.
अमरावतीमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी व्यवसाय सुरू केले आहे. त्यातीलच एक म्हणजे बोपी येथील महिलांनी सुरू केलेले झुणका भाकरी स्टॉल. हे स्टॉल जिल्हाधिकारी कार्यालय ते गर्ल्स हायस्कूल रोडवर आहे. महिला बचत गटातील कृष्णमती ढेरे आणि सारिका टाले यांच्याकडून हे स्टॉल सुरू करण्यात आले आहे.
advertisement
त्यांच्याकडे झुणका भाकर, रोडगे थाली, पुरणपोळी, शेंगदाणा पुरण पोळी हे सर्व पदार्थ मिळतात. पण, यातील सर्वात फेमस म्हणजे झुणका भाकर. हा पदार्थ अमरावतीमध्ये कुठेही मिळेल. पण, ग्रामीण भागातील झुणका भाकरीची चव फक्त येथेच अनुभवायला मिळेल, असे अनेकांकडून सांगण्यात येते. ग्रामीण भागातील झुणका भाकरीची चव मिळण्याचे कारण काय? ते वेगळे असे काय करतात? याबाबतही लोकल18 च्या टीमने जाणून घेतले.
मुंबईतील असं ठिकाण, जिथे फक्त 3 रुपयांपासून मिळतायेत कंदील, खरेदीसाठी बेस्ट मार्केट
कृष्णमती ढेरे यांनी लोकल18 च्या टीमशी बोलताना सांगितले की, त्यांचा बचत गट महात्मा ज्योतिबा फुले या नावाने आहे. त्याच नावाने त्यांनी स्टॉल सुरू केले आहे. बचत गटाला आता 12 वर्ष पूर्ण झाले आहे आणि त्यांचा हा जेवण बनवण्याचा व्यवसाय गेले 8 वर्षापासून सुरू आहे.
राज्यभरात होत असलेल्या प्रदर्शनीमध्ये त्या आपला सहभाग नोंदवतात आणि तिथे आपला स्टॉल लावतात. पण प्रदर्शनी फक्त काही दिवस असते. मग, उर्वरित दिवस काय करायचं? म्हणून त्यांनी हा झुणका भाकर आणि इतर पदार्थांचा स्टॉल लावला आहे. हा स्टॉल लावून त्यांना फक्त 1 महिना झाला आहे. पण भरपूर प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, आमच्याकडे मिळणारी झुणका भाकर विशेष आहे. कारण, आम्ही गावरान ज्वारी वापरतो. झुणका बनवण्यासाठी बेसन पीठही घरीच बनवतो. शेतातील गावरान हरभरा घेऊन त्याची डाळ तयार केली जाते आणि तिला दळून मग त्याचे बेसन पीठ बनवतो, म्हणून आमच्याकडे मिळणाऱ्या झुणका भाकरीची चव ही ग्रामीण भागातील आहे.
हा व्यवसाय उभा करायला भांडवल उभारणीचा खूप मोठा प्रश्न होता. तेव्हा आमचा बचत गटच आमच्या उपयोगी पडला. पण, आमच्या बचत गटातील बचत रक्कम वापरून आम्ही हा व्यवसाय सुरू केला, असेही त्यांनी सांगितले.
झुणका भाकर 60 रुपये प्लेट आहे. यात दोन भाकरी, झुणका, ठेचा, सलाद मिळतो. तसेच रोडगे थाली ही 100 रुपयांमध्ये पोट भर मिळते. त्यात आलू वांग्याची भाजी, वरण भात, सलाद, ठेचा मिळतो. अगदी घरासारखी चव कमीत कमी रुपयांमध्ये आम्ही ग्राहकांना देतो, असे त्या म्हणाल्या. तर मग तुम्हालाही येथील पदार्थांची चव चाखायची असेल तर तुम्ही याठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता.