नाशिक : आपली मराठी भाषा जशी वळणावळणावर बदलते, तसा चटणीचा ठसकाही वाटा-वाटांवर बदलतो. कारण राज्याच्या विविध भागांमध्ये विविध मसाले वापरले जातात. ते बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तसंच प्रत्येक जिल्ह्याचा खास पदार्थही जगभरात लोकप्रिय आहे. जसं की, मुंबईचा वडापाव आणि नाशिकची मिसळ.
नाशिकमध्ये केवळ वाटाणा आणि चिवड्याची किंवा मटकीची मिसळ मिळत नाही, तर जगात कुठंच मिळणार नाही, एवढ्या प्रकारच्या मिसळ इथं खायला मिळतात. नाशिक हे मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे इथं देश-विदेशातून भाविक येतात. त्यांनी जर कोणाला नाशिकचा फेमस पदार्थ कोणता, असं विचारला तर उत्तर मिळतं मिसळ.
advertisement
नाशिकच्या मिसळीला 150 वर्षांची परंपरा आहे, असं अभ्यासक सांगतात. पूर्वी चुलीवरची मिसळ प्रसिद्ध होती. नंतर कोळशावरची मिसळ आली. पुढे डिझेलच्या भट्ट्यांवर मिसळ बनवली जायची. त्यानंतर गॅस आले, त्यावर मिसळ बनवायला सुरुवात झाली. परंतु आजही तीच जुनी मिसळची चव चाखायला मिळते ती 'अंबिका मिसळ'वाल्यांकडे. काळ्या रश्याच्या चवीमुळे ही मिसळ प्रचंड प्रसिद्ध आहे. जी घरगुती काळ्या मसाल्यात बनवली जाते.
1970 साली अर्थात आजपासून 54 वर्षांपूर्वी तुळशीराम कुक्कर यांनी जुन्या नाशकात ही मिसळ बनवायला सुरुवात केली. आज त्यांची तिसरी पिढी अंबिका मिसळ चालवतेय. मिसळ खाल्ली की, अनेकजणांना छातीत जळजळ होऊ लागते, आम्लपित्ताचा त्रास होतो. त्यात काळी मिसळ खाऊन हा त्रास हमखास होत असावा असं वाटत असेल तर असं नाहीये. कारण या मिसळचा काळा मसाला अस्सल घरगुती असतो. त्यामुळे ही मिसळ खाल्ल्यानं कुणालाही आम्लपित्ताचा त्रास होणार नाही, असं मिसळ संचालक निखिल कुक्कर यांनी सांगितलं.
नाशिक पंचवटी भागात अंबिका मिसळ पॉईंट इथं आपण या मिसळीचा आस्वाद घेऊ शकता. एकदा ही मिसळ खाल्ली की, खवय्ये पुन्हा पुन्हा याठिकाणी आवर्जून येतात. जबरदस्त चवीमुळे या मिसळची किंमत जरा जास्त आहे, परंतु 100 रुपयांपेक्षा कमी. या 1 प्लेट मिसळसाठी आपल्याला 90 रुपये मोजावे लागतात.