शेगावात कशी आली कचोरी?
मिळालेल्या माहितीनुसार, भारत पाकिस्तान फाळणीनंतर पंजाबच्या तिरथराम शर्मा यांनी दिल्लीत आपल्या उदरनिर्वाहासाठी कचोरीचे स्टॉल सुरू केले होते. त्याठिकाणी त्यांचं हे काम सुरू असताना रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनचे टेंडर निघाले होते. त्यांनी विदर्भातील शेगाव येथील रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनसाठी टेंडर भरले होते. त्यांना ते काम मिळाले, आणि 1950 च्या आसपास तिरथराम शर्मा शेगाव रेल्वे स्टेशनला कॅन्टीनचे काम सुरू केले. त्याठिकाणी तिरथराम शर्मा यांनी बनवलेली झणझणीत कचोरी तेथील लोकांना आवडू लागली. त्यानंतर कचोरीला शेगाव कचोरी असे देण्यात आले.
advertisement
कचोरीच्या चवीत काहीसा बदल
त्यानंतर श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणारे प्रत्येक भाविक या कचोरीचा आस्वाद घेऊ लागले. हळूहळू तिरथराम शर्मा यांनी कचोरीच्या चवीत थोडा बदल केला. मुगाच्या डाळीऐवजी त्यांनी बेसन पीठ वापरले आणि विदर्भातील लोकांना आवडेल अशा प्रमाणात ते कचोरी बनवू लागले. त्यानंतर ही कचोरी झपाट्याने फेमस होऊ लागली. त्यानंतर काही वर्षात ही कचोरी फक्त विदर्भच नाही तर महाराष्ट्रातील विविध भागांत पोहोचली. शेगावला येणाऱ्या भाविकांनी ही कचोरी परदेशातही पोहोचवली. बाहेरील देशात हे पार्सल घेऊन जाण्यासाठी त्यांनी फ्रोझन कचोरी बनवली. जी बाहेर 5 दिवस आणि फ्रिजमध्ये 15 ते 20 दिवस टिकते.
चविष्ट अशा कचोरीचं गुपित काय?
तीरथराम शर्मा याच्या नवीन पिढीने सुद्धा हा व्यवसाय पुढे सुरूच ठेवला. त्यांनी काळानुरूप अनेक बदल केलेत मात्र चव ही जशीच्या तशी ठेवली. शर्मा यांच्या या चविष्ट आणि झणझणीत कचोरी मागचं नेमकं गुपित काय? तर ते म्हणजे त्यातील मसाला. शर्मा यांच्या 5 मुलांकडून 16 नातवंडांकडे या मसाल्याची रेसिपी आली. घरातील लोकांच्या व्यतिरिक्त ही कचोरी बनवण्यात ते कोणालाही सामील करून घेत नाहीत. त्याचबरोबर त्यांची रेसिपी ते कोणाला सांगत सुद्धा नाहीत. श्री संत गजानन महाराजांच्या भूमीतून आता ही शेगाव कचोरी विविध भागांत पोहोचत आहे. तिरथराम शर्मा यांच्या कचोरीची चव आणि इतर बाबी बघून त्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. कोणी विचारही करू शकणार नाही, असा हा शेगाव कचोरीचा प्रवास आहे.