पुणे: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोकं आपली तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. थंडीच्या दिवसांमध्ये आपलं शरीर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च करते. त्यामुळे भूकही मोठ्या प्रमाणावर लागते. ऊर्जा अधिक प्रमाणावर खर्च होत असल्यामुळे खाल्लेले अन्नही पचवते. बाहेर थंडीचा कडाका वाढत असताना शरीराचे पोषण होईल असा ब्रेकफास्ट आपण खायला हवा. खीर हा थंडीच्या दिवसांत खाण्यासाठी अतिशय उत्तम पदार्थ असून या काळात पौष्टिक खीर खायला हवी.
advertisement
थंडीच्या दिवसांत अळीवाच्या बियांची खीर खावी. अळीवच्या बियां आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात. या बियांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे अनेक आजारांवर देखील त्या उपयुक्त आहेत. अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, सी विटामिन आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हिवाळ्यात अळीव खाणे शरीरासाठी अतिशय उत्तम मानल जातं. त्यामुळे आज आपण अळीवची खीर बनवणार आहेत. अवघ्या काही मिनिटांतच ही खीर बनवून रेडी होते.
अळीवची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अळीव, दूध, केशर, साखर, वेलची पावडर, काजू, बदाम आणि पिस्ता.
कृती: अळीव स्वच्छ निवडून एक तास पाण्यात भिजवून ठेवा. कढईमध्ये सुरुवातीला दोन टेबलस्पून पाणी टाका आणि त्यानंतर अर्धा लिटर दूध घालून उकळी येऊ द्या. दूध गरम झाल्यावर त्यात भिजवलेली अळीव घालून चांगलं मिक्स करा. एका छोट्या वाटीत दोन टेबलस्पून दूध घेऊन त्यात 8–10 केशर काड्या टाका. हे केशर दूध कढईतील मिश्रणात घालून हलवा. दुधाला पुन्हा उकळी आली की गॅस मंद करा. आता त्यात वेलची पावडर, बारीक चिरलेले ड्राय फ्रूट्स आणि साखर घाला. हे मिश्रण साधारण 15 मिनिटे शिजू द्या.अश्या प्रकारे अळीवची खीर तयार होते.