एका आजीने मेथीपासून एक वेगळाच पदार्थ बनवला आहे. ज्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मेथीच्या या चटपटीत पदार्थाची रेसिपी आजीने सगळ्यांसोबत शेअर केली आहे, आजीने मेथीपासून असा नेमका कोणता चटपटीत पदार्थ बनवला आहे पाहुयात.
advertisement
10-12 मिरच्या, दोन लसणीचे कांदे, एक चमचा धने आणि दोन चमचे जिरे सगळं पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. 2 जुडी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. त्यात 2 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ, एक चमचा हळद, दोन चमचे तीळ, एक चमचा ओवा हातावर चोळून टाका, चवीनुसार मीठ आणि एक चमचा कच्चं तेल, वाटलेला मसाला टाकून सगळं नीट मिक्स करून घ्या. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या.
पिठाचे लांब गोळे करून, केळीच्या पानाला तेल लावून त्यात प्रत्येकी एका पानावर एक गोळा गुंडाळून घ्या. व्हिडीओत दाखवल्यानुसार एका मोठ्या मातीच्या भांड्यात पाणी घेतलं आहे, त्यात मक्याची सुकलेली पानं टाकली आहेत आणि त्यावर केळीच्या पानात गुंडाळलेलं पीठ ठेवलं आहे. हे भांडं चुलीवर ठेवून वर झाकण ठेवून ते वाफवून घ्यायचं असेल. हे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही स्टीमर, पातेल्यात किंवा कुकरमध्येही वाफवून घेऊ शकता. याच्या आत काठी किंवा सुरीचं टोक टाकून बघा, जर ते क्लिन आलं तर पीठ नीट शिजलं आहे.
आता हे पीठ काढून थंड झालं की त्याच्या वड्या पाडून घ्या. आता तव्यावर थोडं तेल गरम करा. त्यात मोहरी, जिऱ्याची फोडणी द्या आणि कापलेलं पीठ टाकून परतून शिजवून घ्या. हा चटपटीत पदार्थ म्हणजे मेथीच्या वड्या आहेत.
गावरान- एक खरी चव या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही या वड्या करून पाहा आणि कशा झाल्या आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
