कोणत्याही तयारीविना झटपट मटण-वडे बनवण्याची ट्रिक एका गृहिणीने दाखवली आहे. जिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आता आपण मटण-वडे यांची एकएक करून रेसिपी पाहुयात.
सामान्यपणे वडे म्हटलं की त्यासाठी भाजणी लागते. पण भाजणी न दळता, आयत्यावेळीही करता येतील असे हे वडे. यासाठी 2 कप तांदळाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप बेसन पीठ, पाव कप गव्हाचं पीठ मिक्स करून घ्या. आता कढईत एक चमचा मसूर डाळ भाजून घ्या, त्यात एक टेबलस्पून धने, एक टेबलस्पून बडीशेप, पाव चमचा मेथी दाणे, दालचिनीचे 2 तुकडे, एक मसाला वेलची सगळं भाजून घ्या. गॅस बंद करून कढईतच थंड होऊ द्या. याची बारीक पूड करून पिठात घाला. चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद घाला. गरजेनुसार कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या. मटण शिजवण्याआधी वड्याचं पीठ मळून घ्या आणि ते मुरत ठेवा.
advertisement
कुकरमध्ये 2 चमचे तेल तमालपत्र, 2-3 दालचिनीचे तुकडे, 4-5 लवंग, 7-8 मिरी टाका, बारीक चिरलेला कांदा टाकून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आलं-लसूण पेस्ट टाकून परतून घ्या. पाव चमचा हळद, अर्धा किलो मटण घालून तेलात परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला. आता कुकरवर झाकण किंवा एखादं भांडं ठेवून त्यावर पाणी ठेवून मध्यम आचेवर 10 मिनिटं मटण शिजवून घ्या. भांड्यातलं पाणी मटणात ओतून कुकरचं झाकण लावून 4-5 शिट्ट्या काढून मटण शिजवून घ्या.
अर्धा कप सुक्या खोबऱ्याचं किस कढईत भाजून घ्या. खोबऱ्याचा किस हलका ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या, बाजूला काढा. 2 चमचे तेल घ्या. एक मोठा कांदा उभा चिरून त्यात घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या, 7-8 काजू ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी, 8-10 पाकळ्या लसूण, एक इंच आल्याचा तुकडा घालून परतून घ्या. एक मोठा पिकलेला टोमॅटो घालून 2-3 मिनिटं परतून घ्या. टोमॅटो मऊ झाला की गॅस बंद करा. सुरुवातीला खोबरं मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर कांदा-टोमॅटोचं भाजलेलं मिश्रण टाकून वाटून घ्या.
मटणाच्या कुकरचं झाकण कुकर थंड झाल्यावर उघडा. कढईत 4-5 मोठे चमचे तेल घ्या. त्यात तयार केलेलं वाटण घाला. 2 मिनिटं चांगलं परतून घ्या. वाटणाचा रंग बदलला, तेल सुटायला लागलं की त्यात हळद आवडीनुसार तिखट, एक चमचा धनेपूड, एक चमचा मटण मसाला किंवा गरम मसाला घाला. 2 मिनिटं परतून घ्या. एक पळी मटणाचा रस्सा घाला, 2 मिनिटं परतून घ्या, तेल सुटायला लागलं की मटण टाका. मटण करी किती पातळ हवी तितकं पाणी घाला. 5 मिनिटं मंद आचेवर मटण शिजवून घ्या.
आता वडे करण्यासाठी तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून प्लॅस्टिक पेपरला तेल लावून वडे थापून घ्या. वडे एकदम पातळ किंवा एकदम जाड नसावेत. कढईत तेल चांगलं तापवून घ्या आणि वडे तळून घ्या. वडे तेलात टाकले की ते फुगेपर्यंत गॅस फास्ट करा. वडा पलटला की गॅस मंद करा.
आपले वडे होईपर्यंत मटण करीही शिजून तयार झाली आहे. Marathi Kitchen युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
