जिल्हा परिषद शाळा ते पुण्याचा खडतर संघर्ष
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आदित्यचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. कष्टाने त्याने ॲग्रिकल्चरचे शिक्षण पूर्ण केले. घरच्यांच्या आग्रहास्तव पोलीस भरती दिली, पण त्यात अपयश आले. घरच्यांचा वाढता दबाव आणि मनासारखी नोकरी मिळत नसल्याने अखेर त्याने घर सोडून पुणे गाठले. पुण्यात जगण्यासाठी त्याने पडेल ते काम केले. आदित्य सांगतो की, "एका वेळी माझ्याकडे पैसे नसल्याने मी लोकांची स्वच्छतागृहे देखील मी साफ केले आहेत."
advertisement
संकल्पना सुचली आणि नाशिक गाठले
पुण्यातील एका खानावळीत हेल्पर म्हणून काम करत असताना आदित्यला 'वुडन पिझ्झा' या संकल्पनेबद्दल माहिती मिळाली. नाशिकमध्ये अशा प्रकारचा पिझ्झा अद्याप लोकप्रिय नसल्याचे त्याच्या लक्षात आले. स्वत:चा व्यवसाय करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने पुण्याची नोकरी सोडली आणि पुन्हा नाशिक गाठले.
भाजी विक्री ते स्वतःचा 'ब्रँड'
व्यवसायासाठी भांडवल नव्हते आणि घरच्यांचा पाठिंबाही नव्हता. अशा वेळी आदित्यने इंटरनेट कंपनीत काम सुरू केले. सोबतच, कृषी पदवीधर असल्याने त्याने सेंद्रिय शेती करून पिकवलेली भाजी सायंकाळी रस्त्यावर बसून विकण्यास सुरुवात केली. यातून जमा झालेल्या पैशातून आणि एका मित्राच्या साथीने त्याने आपला पिझ्झाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.
प्रेयसीची खंबीर साथ आणि यशाची भरारी
आदित्यकडे दुकान भाड्याने घेण्या इतपतही पैसे नव्हते. अशा वेळी त्याने जिद्द न हारता युट्युब आणि गुगलच्या मदतीने स्वतःच्या हाताने एक छोटा गाडा तयार केला. या संपूर्ण प्रवासात त्याची प्रेयसी त्याच्या पाठीशी ढाल बनून उभी राहिली. आदित्य आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या प्रेयसीला देतो.
आज आदित्यचा हा युनिक 'वुडन पिझ्झा' नाशिककरांच्या पसंतीस उतरत असून, सोशल मीडियावरही त्याच्या संघर्षाची चर्चा होत आहे. "नोकरीत अडथळे आले, अनेक व्यवसाय केले, पण जिद्द सोडली नाही म्हणून आज मी इथवर पोहोचलो," असे आदित्य अभिमानाने सांगतो.