ऋतुजाचे वडील, अनिल काठे, 25 वर्षांपूर्वी केवळ 6 रुपयांना सँडविच विकत असत. खूप मेहनत करून त्यांनी एक छोटासा गाळा घेतला आणि पत्नीसोबत मिळून व्यवसायाची सुरुवात केली. त्यांचं स्वप्न होतं आपला स्वतःचा व्यवसाय उभा करणं. पण याच काळात त्यांच्या पत्नीला फुफ्फुसांचा गंभीर आजार झाला. गेली 12 वर्षे त्या ऑक्सिजनवर होत्या. घरात आर्थिक तणाव, आरोग्याचे संकट, पण अनिल काठेंनी हार मानली नाही.
advertisement
Goat Farming: नोकरी सोडली, तरुणाने घेतल्या 5 शेळ्या, आता वर्षाला 5 लाखांची कमाई, Video
याच काळात ऋतुजाने आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली. 12 वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने इंटिरिअर डिझाइनमध्ये डिप्लोमा केला. ती सध्या एका ठिकाणी इंटर्नशिप करत असून, त्याचवेळी वडिलांच्या सँडविचच्या दुकानातही मदत करते.
ऋतुजाने आपल्या डिझाइन कौशल्याचा उपयोग करून दुकानाचं संपूर्ण मेकओव्हर केलं. ऑनलाइन सजावटीच्या वस्तूंनी त्या लहानशा गाळ्याचं रुपांतर तिने एका सुंदर कॅफेमध्ये केलं. दुकानात सुधारणा होत असताना, दुःखाची गोष्ट म्हणजे तिच्या आईचं काही दिवसांतच निधन झालं. पण हे संकटही तिने आणि वडिलांनी खंबीरपणे पेललं.
आज ऋतुजा सकाळी उठून दोघांसाठी जेवण बनवते, दिवसभर इंटर्नशिप करते आणि संध्याकाळी परतल्यावर पुन्हा जेवण करून वडिलांना दुकानात मदत करते.
ऋतुजाचं म्हणणं आहे, आई-वडिलांनी खूप कष्ट केलेत. त्यांना आधार देणं हे माझं कर्तव्य आहे. आज मी जे काही करतेय, ते त्यांच्या संघर्षातून शिकले. संघर्षांवर मात करत ऋतुजा आणि अनिल काठे यांचा व्यवसाय आता हळूहळू फुलू लागला आहे आणि ते इतरांसाठीही एक प्रेरणा बनले आहेत.