जालना: सर्वसामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात गृहिणी वर्षभर पुरेल असे पदार्थ घरामध्ये करून ठेवत असतात. कुरड्या, पापड्यासोबतच उन्हाळ्यात आंब्याचेही लोणचे आणि इतर पदार्थ बनवले जातात. यातीलच एक पदार्थ म्हणजे आंबावडी होय. अपचनावर आंबावडी हा एक चांगला उपाय मानला जातो. जालना येथील विद्या उजेड यांनी कच्चा कैरीपासून झटपट होणारी ही आंबावडीची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
आंबावडी बनवण्यासाठी साहित्य
आंबेवड्या तयार करण्यासाठी आपल्याला फ्रेश कच्च्या कैऱ्या आवश्यक आहेत. त्याचबरोबर दोन वाटी पिठीसाखर, एक चमचा काळं मीठ, एक चमचा साधं मीठ, एक जुडी पुदिना, तेल किंवा तूप आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पेस्ट हे साहित्या लागेल.
उन्हाळ्यात बनवा कैरीची खास रेसिपी, पाहा गुळांबा बनवण्याची सोपी पद्धत, Video
आंबेवडी रेसिपी
बाजारातून कच्ची कैरी आणल्यानंतर स्वच्छ धुऊन पुसून घ्यायची. त्यानंतर कैरीची साल काढून घ्यायची. या आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या. आंब्याचे केलेले बारीक तुकडे मिक्सरमधून काढून घेऊन त्याचा बारीक एकजीव गर तयार करायचा. मिक्सर मधून गर काढत असताना त्यामध्ये थोडासा पुदिना घालायचा. ज्यामुळे त्याला हिरवट रंग येईल.
आंब्याचा पातळ गर एका प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पेस्ट घालायची. भाजलेल्या जिऱ्याची पेस्ट शरीरासाठी थंडावा देणारी असते. त्यानंतर दोन वाट्या पिठीसाखर या मिश्रणात ॲड करायची. एक वाटी गर असेल तर दोन वाट्या साखर अशा प्रकारचे प्रमाण ठेवायचे. त्यानंतर या मिश्रणात एक चमचा काळं किंवा सैंधव मीठ आणि चवीप्रमाणे आपलं रोजच्या वापरातलं मीठ टाकायचं. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं.
2 कप ताक अन् 1 चमचा कैरीचा कीस, अशा पद्धतीनं शेवग्याच्या शेंगाची कढी बनेल चविष्ट
मिश्रण एकजीव झाल्यानंतर या मिश्रणाला गॅसवर शिजवण्यासाठी ठेवायचं आणि यातील संपूर्ण मॉइश्चर निघून जाईपर्यंत गॅसवर परतायचं. जेली सारखं घट्ट मिश्रण झाल्यानंतर गॅसवरून उतरून घ्यायचं. यानंतर एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये तेल किंवा तूप पसरून घ्यायचं. त्यावर हे मिश्रण पसरट पसरवायचं. उन्हामध्ये 4 ते 5 तास किंवा दोन दिवस घरामध्ये ठेवून दिल्यास घट्ट पोळीसारखं हे मिश्रण होईल. त्यानंतर आपल्या पद्धतीने गोल किंवा समोस्याच्या आकाराच्या वड्या तयार करायच्या. याला घट्टपणा येण्यासाठी पिठीसाखरेचा वापर देखील करू शकतो किंवा त्याला फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतो.
अशा पद्धतीने आंबावड्याची ही रेसिपी आपण घरच्या घरी तयार करू शकतो. जेवणानंतर दररोज एक ते दोन वड्या खाल्ल्यानंतर आपल्याला अपचन ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. घरच्या घरी तयार होणारी ही रेसिपी प्रत्येक गृहिणीने नक्कीच ट्राय करायला हवी, असं गृहिणी विद्या उजेड यांनी सांगितलं.