लोअर परळ येथे सुरू करण्यात आलेल्या या दुकानात पारंपरिक काचेच्या ग्लासऐवजी मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये मिळणारा शिवा स्पेशल फालुदा सध्या प्रचंड चर्चेत आहे. या खास फालुद्यामध्ये मलाई, केशर आणि बदाम-पिस्ता अशा तीन फ्लेवर्सची कुल्फी, ड्रायफ्रूट्स, चेरी, बिया आणि स्वतः तयार केलेल्या सिक्रेट क्रीमचा वापर करण्यात येतो. दोन व्यक्तींना सहज पुरेल असा हा फालुदा असून, कमी वेळातच ग्राहकांची मोठी गर्दी खेचण्यात तो यशस्वी ठरत आहे.
advertisement
विशेष म्हणजे स्वप्निल आणि निखिल यांनी स्वतःच्या कल्पकतेतून अनेक हटके प्रकार इनव्हेंट केले आहेत. यामध्ये गडबड फालुदा, मारामारी फालुदा यांसारखे युनिक फालुदे खवय्यांचे आकर्षण ठरत आहेत. एकूणच येथे 170 हून अधिक प्रकारचे फालुदे, मिल्कशेक्स आणि ज्यूस उपलब्ध असून, फळांच्या गरापासून बनवलेले ताजे ज्यूस आणि मिल्कशेक्सनाही मोठी मागणी आहे.
कमी किंमत आणि भरपूर क्वांटिटी हे या दुकानाचे खास वैशिष्ट्य आहे. फक्त 80 रुपयांपासून दर सुरू होणारे फालुदे जवळपास अर्धा लिटरच्या मोठ्या ग्लासमध्ये दिले जातात. त्यामुळे कमी किंमत, जास्त क्वांटिटी आणि पोटभर समाधान असा अनुभव ग्राहकांना मिळत आहे.
याठिकाणी फळ सलाड, आईस्क्रीम, फळांचे शेक, मिल्कशेक्स यांचेही विविध फ्लेवर्स उपलब्ध आहेत. सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असलेले हे दुकान काही दिवसांपूर्वीच सुरू झाले असले तरी, अल्पावधीतच दर्जेदार चव आणि वेगळ्या संकल्पनेमुळे मुंबईकर खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे.
पावसाळा कमी होऊन ऑक्टोबरच्या उकाड्याची चाहूल लागली असताना, थंडगार फालुदा, ज्यूस आणि आईस्क्रीमसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात ज्यूस सेंटरकडे वळत आहेत. अशा वेळी लोअर परळमधील शिवा स्पेशल फालुदा हा खवय्यांसाठी नक्कीच एक नवा आणि परवडणारा पर्याय ठरत आहे.





