- अतिप्रमाणात दारू प्यायल्यानं यकृतावर अत्यंत गंभीर परिणाम होतो. यामुळे फॅटी लिव्हर, हेपेटायटिस, सिरॉसिस यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे दारूचं सेवन अजिबात करू नये, नाहीतर हळूहळू यकृत खराब होऊ शकतं.
- वजन वाढल्यास, पोटाच्या आजूबाजूला चरबी तयार झाल्यास नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होण्याचा धोका असतो. यामुळे दारू न पिताही लिव्हर खराब होऊ शकतं. हळूहळू हा आजार लिव्हर सिरॉसिसचं रूप घेऊ शकतो.
- अति मीठ आणि कार्बोहायड्रेटयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्यानं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतं. ज्यामुळे चरबी यकृतात जमा होऊ लागते आणि यकृताच्या कार्यात बिघाड होऊ लागतो.
- हेपेटायटिस बी आणि सी विषाणूपासून यकृत बिघडू शकतं. रक्त आणि शरीरातील द्रव पदार्थांमधून हे विषाणू पसरतात. त्यामुळे वेळोवेळी लसीकरण आणि तपासणी करून घेणं आवश्यक असतं.
- काही औषधं दीर्घकाळ घेतल्यानं यकृतावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही गोळी, औषध किंवा इंजेक्शन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नाहीतर लिव्हर डॅमेज होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
advertisement
यकृताचं कार्य सुरळीत राहावं यासाठी दारू पिणं पूर्णपणे थांबवावं. हळूहळू हे व्यसन सोडावं. तसंच आपलं वजन हे आपली उंची आणि वयानुसार नियंत्रित असणं आवश्यक आहे. नेहमी संतुलित आहार घ्यावा, व्यायाम करावा. गोड पदार्थ आणि कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ कमी खावे. अति साखरेमुळे यकृतावर दबाव येऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे यकृताची वेळोवेळी तपासणी करावी. जेणेकरून जर काही आजार असेल तर त्याचं वेळेत निदान होईल आणि लवकरात लवकर उपचार घेता येतील.
गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉ. देवेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, यकृतावर उपचार घेण्याची वेळ आली तर ते फार महागात पडू शकतं, आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्याही. एकदा यकृत खराब होऊ लागलं की, सतत रुग्णालयाच्या वाऱ्या पाठीशी लागतात. यकृताची स्थिती गंभीर झाल्यास अगदी ट्रान्सप्लांटचीही आवश्यकता भासू शकते. त्यासाठी साधारण 30 ते 32 लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो आणि वेदनादायी शस्त्रक्रियांमधून जावं लागतं ते वेगळंच. अशी वेळ येऊ नये यासाठी आपली जीवनशैली सुधारण्याकडे लक्ष द्यावं. केवळ यकृतच नाही, तर संपूर्ण शरीर सुदृढ कसं राहील हे पाहावं.
यकृत हा शरीराचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. अन्नपदार्थ पचवणं, विषारी तत्त्व शरीराबाहेर काढणं आणि संपूर्ण शरीर सुदृढ ठेवण्यात यकृताची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे जर यकृत सुदृढ असेल तरच संपूर्ण शरीर सुदृढ राहू शकतं. त्यामुळे संतुलित आहार घ्यावा, शरीर निरोगी राहील अशा सवयी लावून घ्याव्या, तसंच वेळोवेळी यकृताची तपासणी करावी. तरच यकृताचं कार्य वर्षानुवर्षे उत्तम राहू शकतं आणि आपण जगण्याचा आनंद सर्वोत्तम घेऊ शकता.