महिलांमध्ये सध्या गर्भपिशवीच्या संदर्भातील आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत असून, त्यातून गंभीर आणि गुंतागुंतीची वैद्यकीय स्थिती निर्माण होते. सदर महिला काही दिवसांपासून सतत रक्तस्राव, पोटात गोळा जाणवणे आणि झपाट्याने कमी होत असलेले हिमोग्लोबिन अशा गंभीर तक्रारी घेऊन जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तपासणीदरम्यान तिच्या गर्भाशयात अनेक मोठ्या गाठी असल्याचे स्पष्ट झाले होते.
advertisement
आईवडील की कसाई? जन्मलेल्या बाळासोबत असं कोण वागतं? छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता चव्हाण यांनी गुरुवारी ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान साधारण 60 ग्रॅम वजनाच्या गर्भपिशवीतून सात मोठ्या गाठी काढण्यात आल्या, ज्यांचे एकत्रित वजन दोन किलो होते. एवढ्या लहान अवयवामध्ये इतक्या मोठ्या गाठी असल्याने गर्भाशयाचा आकार आणि अंतर्गत रचना पूर्णतः बदलली होती, त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि कौशल्याची कसोटी पाहणारी ठरली.
शस्त्रक्रियेनंतर संबंधित महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून, तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, डॉ. लता वेडेकर, डॉ. संजय चव्हाण, डॉ. अर्चना वसुकर, अनिता जारवाल, तसेच परिचारिका वैष्णवी धारकर, पल्लवी मुथा, निवासी डॉक्टर, परिचारिका आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.
गर्भाशयात का होतात गाठी?
डॉक्टरांच्या माहितीनुसार इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या प्रभावामुळे गर्भाशयात गाठी होण्याची शक्यता वाढते. कुटुंबातील नात्यात कोणाला गाठी असतील तर पुढील पिढीत धोका वाढू शकतो. लठ्ठपणा, पोटावरील चरबी, वजन वाढणे यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते. लहान वयात मासिक पाळी सुरू झाल्यास धोका काही प्रमाणात वाढतो. तसेच ताणतणाव, कमी व्यायाम, जंक फूडचे सेवन आणि अपुरी झोप यामुळेही गाठी होण्याचा धोका वाढतो.
...तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या
खूप जास्त रक्तस्राव होणे, सात ते आठ दिवसांपेक्षा जास्त मासिक पाळी चालणे, पाळीत मोठे गुठळे पडणे, पोटात गोळा किंवा जडपणा जाणवणे, कंबरदुखी, पाठीचा त्रास, वारंवार लघवीला होणे, हिमोग्लोबिन कमी होणे, चक्कर येणे, थकवा आणि धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास महिलांनी तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
डॉक्टर म्हणतात...
डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले की, “मी स्वतः पहिल्यांदाच एवढी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. गर्भपिशवीतून सात गाठी काढण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शस्त्रक्रियागारातील संपूर्ण पथकाचे मोठे योगदान आहे.”






