नवी दिल्ली : अन्नपाणी शरिरात जातं म्हणून शरीर छान निरोगी राहतं. हे अन्नपाणी व्यवस्थित चावून पचण्यायोग्य करून शरिरात घालवण्याचं काम करतात आपले दात. त्यामुळे दातांशिवाय जगण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हसल्यावर, काहीही बोलताना सर्वात आधी दिसतात तेही दातच. त्यामुळे दात कायम पांढरेशुभ्र आणि निरोगी असायला हवे.
वयानुसार दातांचा रंग उडणं, दात पडणं सामान्य आहे. परंतु जर त्यांची योग्य निगा राखली नाही, तर वयाआधीच दात खराब होऊ शकतात. मग मात्र आपल्याला अन्न खायलाही त्रास होऊ शकतो आणि जर अन्नच पोटात गेलं नाही, तर आपल्याला अशक्तपणा येतो. त्यामुळे आज आपण दातांची काळजी नेमकी कशी घ्यावी याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घेणार आहोत.
advertisement
हेही वाचा : विचारांनी डोकं फुटायची वेळ येते? ताण-तणावाला द्या सुट्टी! घ्या फक्कड आयुर्वेदिक चहा
डेंटिस्ट डॉक्टर सुशील कुमार दुआ सांगतात की, तोंड स्वच्छ ठेवल्यास दातांच्या 80 ते 90 टक्के समस्या दूर होऊ शकतात. विशेष म्हणजे दात सुदृढ ठेवण्यासाठी व्यवस्थित ब्रश करायलाच हवं, शिवाय आहारही संतुलित असायलाच हवा. आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करावा. फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे दात भक्कम राहतात. शिवाय सकाळी आणि रात्री असं न चूकता दिवसातून 2 वेळा दातांना ब्रश करावं. रात्री ब्रश केल्यानंतर केवळ पाणी प्यावं, इतर काहीच खाऊ नये. कारण अन्नपदार्थांचे कण रात्रभर दातांमध्ये राहिल्यास दातांना कीड लागू शकते.
डॉक्टरांनी सांगितलं की, दात दीर्घायुष्यी निरोगी राहावे असं वाटत असेल तर तंबाखूचं सेवन अजिबात करू नये. कारण तंबाखूमुळे शरिराचं नुकसान होतंच, शिवाय दात प्रचंड खराब होतात. तंबाखूमुळे तोंडाचे आणि दातांचे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्यावी.