जयपूर : आपली त्वचा तजेलदार, तरुण दिसावी यासाठी आपण कितीतरी महागडे प्रॉडक्ट्स वापरतो. अनेकजण घरच्या घरी त्वचेची काळजी घेतात. खरंतर आपला चेहरा हा आपल्या पूर्ण व्यक्तिमत्त्वातला महत्त्वाचा भाग आहे. कोणीही सर्वात आधी आपला चेहरा पाहतं, त्यामुळे तो कायम टवटवीत दिसावा यासाठी आपण प्रयत्न करतो.
आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्यावर जणू मळाचे थर बसतात आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्यामुळे चेहऱ्याची खरी चमक टिकवून ठेवण्यासाठी काळजी घ्यायलाच हवी. नेमकं करायचं काय याबाबत मेकअप आर्टिस्ट सरिता प्रजापत यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत.
advertisement
त्यांनी सांगितलं, लिंबू आणि गुलाबपाणी चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतं. याने दररोज 10 मिनिटं चेहऱ्याला मसाज करावी. मग 20 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येतं. त्वचा खूप जास्त निस्तेज झाली असेल तर कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याआधी चेहऱ्याला गुलाबपाणी लावून वरून काकडीचा काप चोळावा. त्यावर मिल्क क्रीम आणि गुलाबपाण्याच्या पेस्टने 5 मिनिटं त्वचेला मसाज करावी. मग कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावं. यामुळे दिवसभर चेहरा छान चमकदार दिसेल.
हेही वाचा : महागड्या प्रॉडक्टची गरज नाही पडणार! आंघोळीआधी करा 1 काम, त्वचा होईल तुकतुकीत
चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी 2 चमचे चंदन पावडरमध्ये अर्धा कप गुलाबपाणी आणि चमचाभर हळद मिसळा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून 30 मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. तर पिंपल दूर करण्यासाठी 2 चमचे ग्रीन टी व्यवस्थित फेटाळा. त्यात चमचाभर दही मिसळा. हे पॅक चेहरा आणि मानेला लावा. 10 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून घ्या. पिंपल घालवण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे.
सूचना : ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.