डॉ. दहीहंडे यांच्या कार्याला त्यांच्या पत्नी डॉ. देवयानी दहीहंडे या स्त्रीरोग तज्ज्ञांचा मोठा हातभार लाभला आहे. महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, विशेषतः गर्भधारणेच्या काळात लागणारे नऊ महिन्यांचे उपचार, तपासण्या आणि खर्चिक औषधोपचार हे सर्व सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. इतकेच नाही तर रुग्णांना आवश्यक त्या गोळ्या, औषधे यावर सूट मिळते. रक्त तपासणी, लघवी तपासणीसह विविध वैद्यकीय चाचण्या देखील कमी दरात रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे दहीहंडे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
advertisement
Society Cleaning: तुमच्या सोसायटीत कबुतरांनी घरं केली? होऊ शकतो सगळ्यांना गंभीर आजार
देशासाठी काहीतरी देण्याची भावना मनात बाळगून डॉ. दहीहंडे यांनी गेल्या 15 ऑगस्टपासून या सेवेला सुरुवात केली. अल्पावधीतच 15 ते 20 रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून त्यांना उपचार आणि तपासण्या पूर्णपणे मोफत मिळाल्या आहेत. त्यामुळे या वैद्यकीय उपक्रमाला समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
गरीब रुग्णांच्या डोळ्यांत दिलासा, शहीद आणि सैनिक कुटुंबीयांच्या मनात आदर, आणि पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान या उपक्रमामुळे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींपासून स्थानिक ग्रामस्थांपर्यंत सर्वांनीच डॉ. दहीहंडे यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत देशसेवेतून समाजसेवेपर्यंतचा प्रवास करताना दहीहंडे दाम्पत्याने एक आदर्श निर्माण केला आहे.