गुमला : जून महिना उजाडला तरी फेब्रुवारी अखेरीपासून वाढलेला तापमानाचा पारा काही ओसरायचं नाव घेत नाहीये. मे महिन्यात राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला खरा, परंतु तापमानाची स्थिती पुन्हा जैसे थे झाली. आज प्रत्येकजण चातकासारखी पावसाची वाट पाहतोय. हवामान विभागाने राज्यात 10 जून रोजी मान्सूनचं आगमन होईल, असा अंदाज दिलाय. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला उन्हापासून स्वतःचं आणि आपल्या प्रियजनांचं रक्षण करायलाच हवं.
advertisement
उन्हाळ्यात केवळ शरिरातून भरपूर घाम बाहेर पडत नाही, तर ओठ सुकतात, तोंड कोरडं पडतं, नाकातून रक्त वाहू शकतं, डोकं गरगरल्यासारखं वाटतं, अशक्तपणा येतो, शरिरावर घामोळा येतो, त्यातून डाग पडतात, ताप येतो, घसा सुकतो, सतत तहान लागते. त्यामुळे अंगभर कपडे घालणं, जास्तीत जास्त पाणी पिणं ही काळजी आवर्जून घ्यायला हवी.
हेही वाचा : चहा, कॉफी सोडा; स्पेशल Tea घ्या, वजन झटक्यात होईल कमी! रेसिपी सोपी
'हीट स्ट्रोक' हा एक गंभीर आजार आहे जो वाढत्या तापमानामुळे होतो. यात तब्येत जास्त खालावल्यास व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. कारण हीट स्ट्रोकचा परिणाम थेट मेंदूवर होतो. तज्ज्ञ सांगतात की, हीट स्ट्रोकचा धोका नवजात बाळापासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना असतो. विशेषतः गरोदर महिलांना यापासून जपावं लागतं, कारण वाढत्या तापमानाचा परिणाम त्यांच्या पोटातल्या बाळावर होत असतो.
जर चक्कर आल्यासारखं वाटलं, हृदयाची धडधड वाढली, धाप लागली, घामच येत नसेल, लघवीला होत नसेल, लघवी झाली तरी गडद पिवळी असेल, तर ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्यावी. हा हीट स्ट्रोक असू शकतो. यामुळे शरिराला जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवण्याची आवश्यकता असते. नेमकं करावं काय तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
उपाशीपोटी घराबाहेर पडू नये
डॉक्टर राजू कच्छप यांनी सांगितलं की, वाढत्या तापमानात गरोदर स्त्रिया आणि वृद्ध व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे त्यांनी पोटभर जेवण करावं. सकाळचा नाश्ता व्यवस्थित व्हायला हवा. कधीच उपाशीपोटी घराबाहेर पडू नये. बाहेर जाताना सूती कपडे परिधान करा. छत्री घेऊनच बाहेर पडा. उन्हापासून शरिराचं जास्तीत जास्त रक्षण होईल याची काळजी घ्या.
दुपारी शक्यतो घराबाहेर पडू नये
दुपारच्या उन्हात बाहेर पडण्याची फारच गरज असेल तर भरपूर पाणी पिऊन निघावं. शिवाय सोबतही पाणी घ्यावं. कपडे ढिले आणि सूती घालावे. वाढत्या तापमानात मेंदूच्या नसा फुटण्याचीही शक्यता असते. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. ब्लड प्रेशर वाढू शकतं. जुलाब लागू शकतात. यापैकी कोणतंही लक्षण जाणवलं तर डॉक्टरांकडे जा. शिवाय पाण्यासह ताक, लस्सी असे पेय पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात शरिरात जायला हवे.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.