सततचा ताण, तणाव, चुकीचा आहार आणि अपुरी झोप यामुळे स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते. ही समस्या लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच जाणवत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय देखील प्रभावी ठरू शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे आणि पारंपरिक उपाय आपल्या घरातच उपलब्ध आहेत, फक्त ते नियमितपणे करणे गरजेचे आहे.
Health Tips: मिठाला पांढर विष का म्हणतात? हे वाचून आज कराल खाणं बंद
advertisement
आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश
दररोज सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम, अक्रोड आणि मनुके खाणे, हा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. बदामात ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स असतात, जे आपल्या मेंदूच्या पेशींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. अक्रोडामध्ये अँटीऑक्सिडंट्स असून ते मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देतात. तसेच मनुका खाल्ल्याने नैसर्गिक साखर मिळते. यातून मेंदूला त्वरित ऊर्जा मिळते.
ताज्या भाज्या आणि फळे
स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा समावेश, करणं देखील महत्त्वाचं आहे. सफरचंद, केळी, डाळिंब आणि आवळा ही फळे मेंदूसाठी उपयुक्त असून त्यातील पोषकतत्त्वे विचारशक्ती सुधारण्यास मदत करतात. दररोज सकाळी मधासोबत एक चमचा आवळा पावडर घेतल्यास स्मरणशक्ती सुधारते, असं अनेक आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. तसेच दूध आणि हळद यांचे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मानसिक थकवा दूर होतो.
योग आणि प्राणायम
दररोज योगासने आणि प्राणायाम केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. 'अनुलोम-विलोम' आणि 'भ्रामरी' प्राणायाम हे मेंदूला ऑक्सिजनची योग्य मात्रा पुरवतात. ध्यानधारणेमुळे मन स्थिर होते आणि एकाग्रता वाढते. विशेषत: विद्यार्थ्यांसाठी किंवा मानसिक ताण येईल असे, काम करणाऱ्यांसाठी हे उपाय फारच फायदेशीर ठरतात.
एकूणच, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी योग्य आहार, शारीरिक आणि मानसिक विश्रांती तसेच नैसर्गिक उपाय यांचा समतोल ठेवणं गरजेचं आहे. औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी हे घरगुती उपाय स्वीकारल्यास दीर्घकालीन फायदे मिळू शकतात. घरगुती उपायांचा अवलंब केल्यास स्मरणशक्तीत लक्षणीय सुधारणा होते, असं बीड येथील डॉक्टर झांजुर्णे यांनी देखील सांगितलं आहे.