लठ्ठपणा ही एक वैद्यकीय स्थिती असून मुलाचे वजन त्याच्या वय आणि उंचीच्या प्रमाणात जास्त असल्यास त्याला लठ्ठ मानले जाते. याचा परिणाम केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही तर भावनिक आणि सामाजिक विकासावरही होतो. मुलांमध्ये जलद गतीने वजन वाढणे, हार्मोनल असंतुलन, सतत थकवा, दम लागणे, सांधेदुखी, तसेच त्वचेवर काळे दिसणे ही त्याची काही लक्षणे आहेत.
advertisement
Health Tips: सारखा अशक्तपणा जाणवतोय? जीवघेण्या आजाराचे लक्षणं तर नाही ना? एकदा वाचाच!
लठ्ठपणामुळे मुलांना एकटेपणा, आत्मविश्वासाचा अभाव, चिडचिड, नैराश्य यांचा सामना करावा लागू शकतो. मित्रमंडळात थट्टा होण्याच्या भीतीमुळे ते सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे टाळतात. काही वेळा त्यांना समुपदेशनाचीही गरज भासते. बालपणातील लठ्ठपणा प्रौढावस्थेत टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक, डिस्लिपिडेमिया, पीसीओएस, स्लीप एपनिया, ऑस्टियोआर्थरायटिस, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, गॅस्ट्रो-एसोफेजियल रिफ्लक्स यासारख्या आजारांना आमंत्रण देतो. एवढेच नाही तर वंध्यत्व, काही कर्करोग यांचा धोका देखील वाढतो.
बालपणातील लठ्ठपणा वाढण्यामागे अनुवंशिकता, चुकीच्या आहाराच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव, जास्त स्क्रीन टाइम, तणाव आणि कौटुंबिक घटक हे प्रमुख आहेत. लठ्ठपणावर मात करण्यासाठी जीवनशैलीत बदल अत्यावश्यक आहे. पालकांनी मुलांच्या आहारात फळे, भाज्या, तृणधान्य, डाळी, सुकामेवा यांचा समावेश करावा. साखरयुक्त, तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. नियमित व्यायाम, खेळ आणि शारीरिक हालचाली यावर भर द्यावा. स्क्रीन टाइम कमी करणे आणि नियमित झोपेच्या सवयी लावणे देखील गरजेचे आहे.
लठ्ठपणा हा फक्त दिसण्याचा प्रश्न नसून मुलाच्या भविष्यातील आरोग्याचा प्रश्न आहे. पालकांनी मुलांच्या बीएमआयवर लक्ष ठेवावे, नियमित तपासणी करावी आणि संतुलित आहार तसेच शारीरिक हालचालींना प्रोत्साहन द्यावे.
महत्त्वाच्या टिप्स
सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका
संतुलित आहाराचे सेवन करा
स्क्रीन टाइम कमी करा, खेळांमध्ये सहभाग वाढवा
सकारात्मक शरीर प्रतिमा तयार करा
बालरोगतज्ञांकडून नियमित वाढ आणि विकास तपासा
बालपणातील लठ्ठपणा टाळण्यासाठी पालक, शाळा आणि आरोग्यतज्ञांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. योग्य पोषण, सक्रिय जीवनशैली आणि भावनिक आधार या तीन गोष्टी मुलांच्या निरोगी भविष्यासाठी अत्यावश्यक आहेत.