योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून संपूर्ण शरीराला सुदृढ ठेवणारा एक वैज्ञानिक मार्ग आहे. नियमित योगाभ्यासामुळे स्नायू आणि हाडे बळकट होतात, शरीर लवचिक राहते तसेच पचनक्रिया आणि श्वसनक्रियेत सुधारणा होते. योगामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते. शरीराच्या ऊर्जेवर आणि कार्यक्षमतेवर याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी योगाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं.
advertisement
ध्यान ही मनाला स्थिर ठेवण्याची आणि एकाग्रता वाढवण्याची एक प्रभावी पद्धत आहे. सततच्या धावपळीमुळे निर्माण होणारा ताण, चिंता आणि नैराश्य यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम उपाय ठरतो. संशोधनानुसार, ध्यान केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि व्यक्तीचा दृष्टीकोन सकारात्मक राहतो. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी ध्यान अपरिहार्य आहे.
योग आणि ध्यान या दोन्हींचा एकत्रित सराव केल्याने शरीर आणि मन यांचा संतुलित विकास साधता येतो. शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळते, तर मनाला शांतता आणि आत्मविश्वास मिळतो होतो. जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक ताकद ध्यानातून मिळते आणि शारीरिक तंदुरुस्ती योगातून मिळते. या दोन्हींच्या संयोगामुळे व्यक्ती अधिक निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवन जगू शकते.
गेल्या काही वर्षांपासून जगभर 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा केला जातो. यावरून योग आणि ध्यानाचे जागतिक महत्त्व स्पष्ट होते. शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि विविध संस्थांमध्येही योग व ध्यानाचा समावेश वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज केवळ 30 ते 45 मिनिटे योग व ध्यान केल्यास अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येतं आणि जीवनशैली अधिक समृद्ध होते. म्हणूनच निरोगी व तणावमुक्त जीवनासाठी योग व ध्यान हे दोन घटक प्रत्येकाने अंगीकारले पाहिजेत.