कोडरमा : हिवाळा म्हणजे अनेकजणांच्या आवडीचा ऋतू. या थंडीच्या दिवसांमध्ये लोक विविध ठिकाणी फिरायला जाण्याचे प्लॅन आखतात. अंगणात शेकोटी पेटवून कुटुंबच्या कुटुंब एकत्र येऊन ऊब घेतात. सर्वत्र अगदी अल्हाददायी वातावरण असतं. परंतु थंडीचे महिने कितीही गुलाबी असले तरी सोबत घेऊन येतात त्वचेचा रखरखीतपणा. हळूहळू त्वचा एवढी कोरडी होते की, त्यात वेदना होऊ लागतात, कधीकधी रक्त येऊ लागतं. हिवाळ्यात पायांच्या टाचांना भेगा पडण्याची समस्याही सामान्य आणि वेदनादायी आहे. त्यामुळे त्यावर वेळीच उपाय करणं आवश्यक असतं.
advertisement
आयुर्वेदिक डॉक्टर प्रभात कुमार यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की, हिवाळ्यात पायांना भेगा पडण्याचा त्रास स्त्री किंवा पुरुष सर्वांनाच होऊ शकतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणं सामान्य आहे, परंतु जास्त वेळ पाण्याच्या संपर्कात राहिल्यानं पायांना भेगाही पडू शकतात.
रात्री झोपण्यापूर्वी टाचांना खोबरेल तेलानं किंवा मोहरीच्या तेलानं मालिश करावी. यामुळे रात्रभर तेल मुरल्यानं टाचा मऊ होतात. परिणामी काहीच दिवसांत भेगा भरून निघू शकतात. जर या उपायानं आराम आला नाही, तर कोरफडाचा गर हा त्वचेच्या सर्व समस्यांवर एक प्रभावी उपाय मानला जातो. आपण दररोज रात्री टाचांमधील भेगांमध्ये कोरफडचा गर भरू शकता. त्यामुळे टाचा लवकर बऱ्या होऊ शकतात.
टाचांच्या भेगा घालविण्यासाठी मधही अत्यंत फायदेशीर ठरतं. मधात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे भेगा दूर होण्यास मदत मिळते. आपण मधात गरम पाणी घालून फूट स्क्रब करू शकता किंवा पायांना मास्क म्हणून थोडावेळ लावून ठेवू शकता. तेही फायद्याचं ठरतं. यामुळे आपले पाय मऊ आणि सुंदर दिसतील.