तज्ज्ञांच्या मते, गरम पाणी पचन सुधारण्याबरोबरच शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी मदत करतं. अनेक लोकांना बद्धकोष्ठता, आम्लपित्त किंवा गॅसच्या तक्रारी जाणवतात. सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय लावल्यास या समस्या नैसर्गिकरीत्या दूर होऊ शकतात. गरम पाण्यामुळे पचन रसांची निर्मिती वाढते आणि अन्नाचे विघटन सुलभ होते. त्यामुळे दिवसभर पोट हलकं वाटतं आणि पचनसंस्थेवर ताण कमी पडतो.
advertisement
गरम पाणी केवळ पचनासाठीच नव्हे, तर रक्ताभिसरण सुधारण्यासाठीही उपयुक्त ठरतं. कोमट पाण्यामुळे रक्तवाहिन्या प्रसारित होतात, त्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह अधिक सुरळीत राहतो. यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो आणि थकवा कमी जाणवतो. तसेच, नियमित गरम पाणी पिण्यामुळे त्वचा निरोगी, तजेलदार आणि मऊ राहते, असा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे.
वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठीही ही सवय फायदेशीर ठरते. गरम पाणी शरीरातील चरबी वितळवण्यास मदत करतं आणि मेटाबॉलिझम वाढवतं. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणं वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतं. काही संशोधनांनुसार, नियमित गरम पाणी पिण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनसंस्था निरोगी राहते, ज्यामुळे एकूणच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तथापि, आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, पाणी अति गरम नसावं, कारण अतितापमानामुळे तोंड, घसा आणि अन्ननलिका जळण्याचा धोका असतो. पाणी कोमट आणि सहज पिण्याजोगं असणं सर्वात योग्य आहे. सकाळी गरम पाणी पिण्याची ही साधी सवय अंगी बाणवली, तर ती केवळ पचन नव्हे तर एकूण आरोग्य सुधारण्यात मोठी भूमिका बजावू शकते. छोट्या बदलातून मोठं आरोग्य लाभू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही सवय.





