अत्याधिक मोबाईल वापरामुळे डोळ्यांचे आजार वाढत आहेत. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने ड्राय आय सिंड्रोम, डोकेदुखी, अस्पष्ट दृष्टी आणि डोळ्यांचा ताण वाढतो. तसेच मानदुखी, खांद्यातील वेदना आणि पाठीचा त्रास ही सुद्धा टेक नेक सिंड्रोमच्या रूपात सामान्य होत चालली आहेत. डॉक्टरांच्या मते, हे सर्व दीर्घकाळ मोबाईल हातात धरून बसणे आणि चुकीच्या पोश्चरमुळे होत आहे.
advertisement
मानसिक आरोग्यावर होणारे परिणामही कमी भयानक नाहीत. सतत मोबाईल वापरामुळे मेंदूवरील ताण वाढतो, एकाग्रता कमी होते आणि झोपेची गुणवत्ता घटते. ब्लू लाईटमुळे मेलाटोनिन या झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोनचे प्रमाण कमी होते, परिणामी निद्रानाश, चिडचिड आणि ताण निर्माण होतो. याशिवाय सोशल मीडियाच्या व्यसनामुळे डिप्रेशन आणि चिंता विकारांची प्रकरणेही वाढत आहेत.
यावर उपाय म्हणून काही सोप्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. दिवसात ठरावीक वेळाच मोबाईल वापरणे, रात्री झोपण्याच्या किमान एका तासापूर्वी मोबाईलपासून दूर राहणे, दर तासाभराने स्क्रीनपासून डोळ्यांना विश्रांती देणे आणि मोबाईलच्या ऐवजी प्रत्यक्ष संवादावर भर देणे हे काही प्रभावी उपाय आहेत. तसेच मुलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर पालकांनी नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोबाईलचा वापर पूर्णपणे थांबविणे शक्य नाही, परंतु त्याचा विवेकपूर्ण आणि मर्यादित वापर केल्यास आरोग्य टिकवून ठेवणे शक्य आहे. त्यामुळेच, आज प्रत्येकाने या डिजिटल व्यसनावर नियंत्रण ठेवणे आणि मोबाईलवर नव्हे, तर आयुष्यावर लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज बनली आहे.





