स्क्रब टायफस म्हणजे काय?
याबाबत माहिती देताना डॉ. धीरज आंडे सांगतात की, स्क्रब टायफस हा बॅक्टेरियामुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने चिगर नावाच्या लहान किड्याच्या चाव्याने पसरतो. हे कीटक झुडपांमध्ये, शेतीत, गवतामध्ये किंवा जनावरांच्या शरीरावर आढळतात. चावल्यानंतर काही दिवसांत संसर्ग शरीरात पसरतो आणि तापासारखी लक्षणे दिसू लागतात.
IVF करणं चांगलं की वाईट? कुणी करावं? पाहा वय, नियम आणि A टू Z माहिती
advertisement
या आजाराची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत
अचानक तीव्र ताप येणे. अंगदुखी, थकवा आणि स्नायूंमध्ये वेदना होणे. डोकेदुखी आणि घशात वेदना होणे. त्वचेवर पुरळ येणे. चावलेल्या ठिकाणी काळसर खपलीसारखा डाग दिसणे. गोंधळलेपणा, उलट्या, पोटदुखी अशी लक्षणेही काही रुग्णांत दिसतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनाचे त्रास, मूत्रपिंड निकामी होणे किंवा मेंदूवर परिणाम होऊ शकतो, ही सर्व स्क्रब टायफस या आजाराची लक्षणे आहेत.
या आजाराचा कोणाला धोका अधिक असतो?
शेती करणारे आणि शेतात वारंवार जाणाऱ्या लोकांना या आजाराचा धोका असतो. तसेच झुडपं, ओलसर माती किंवा जनावरांच्या संपर्कात असणारे लोक, गावाबाहेरील झोपड्यांमध्ये किंवा कुडाच्या घरांमध्ये राहणारे या लोकांना जास्त धोका असतो. या आजाराचा संसर्ग पावसाळा आणि हिवाळ्याचे दोन महिने जास्त होतो, असेही डॉ. आंडे सांगतात.
हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
झुडपं, गवत किंवा शेतीत काम करताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत. शरीरावर मोस्किटो लोशन किंवा स्प्रे वापरावा. घरी किंवा शेताजवळ झुडपं, गवत, ओलसर जागा असल्यास त्या स्वच्छ ठेवाव्यात. जनावरांच्या अंगावर आणि आसपास स्वच्छता राखावी. ताप, पुरळ, अंगदुखी अशी लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
डॉक्टर सांगतात की, स्क्रब टायफस हा दुर्लक्षित पण गंभीर संसर्ग आहे. त्याची लक्षणे साध्या तापासारखी असल्याने अनेकदा दुर्लक्ष होते. पण, वेळेवर उपचार न झाल्यास हा आजार जीवघेणा देखील ठरू शकतो. वेळेत तपासणी आणि काळजी घेतली तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, अशी माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली.





