मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बदाम, अक्रोड आणि काजू यांचा नियमित वापर फायदेशीर ठरतो. यामध्ये असणारे ओमेगा-3 फॅटी अॅसिड, जीवनसत्त्व ई आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूतील पेशींना मजबुती देतात. अक्रोडचा आकारच मेंदूसारखा असल्याने तो मेंदूच्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे सांगितले जाते. तसेच दररोज 5-7 बदाम भिजवून खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते.
Health Tips: आरोग्यासाठी फायदेशीर ॲव्होकॅडो फळ, रोज खाल तर हे आजार राहतील कामय दूर, Video
advertisement
घरगुती उपायांमध्ये तुपाचा समावेश महत्त्वाचा मानला जातो. शुद्ध गाईचे तूप मेंदूतील पेशींना पोषण देऊन लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवते. तुपासोबत दूध घेतल्यास झोप चांगली लागते आणि मानसिक थकवा दूर होतो. याशिवाय ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पतींचे सेवन मेंदूला शांत ठेवते आणि ताण कमी करते.
हिरव्या भाज्या, फळे आणि धान्य यांचाही मेंदूच्या आरोग्यात मोठा वाटा असतो. पालक, मेथी, ब्रोकोली, सफरचंद, द्राक्षे आणि संत्री यामध्ये असणारे पोषक घटक स्मरणशक्ती सुधारतात. मासे आणि अंड्याचा पिवळा बलक यामध्ये असलेले प्रथिने आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड मेंदूच्या पेशींची झीज कमी करतात. त्यामुळे संतुलित आहार घेतल्यास मेंदू दीर्घकाळ सक्रिय राहतो.
नियमित व्यायाम, ध्यानधारणा, पुरेशी झोप आणि ताण कमी करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा वाढतो, तर ध्यानामुळे मानसिक शांती मिळते. झोपेच्या अभावामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते, त्यामुळे किमान सात तासांची झोप आवश्यक आहे. योग्य आहारासोबतच या सवयी अंगीकारल्यास मेंदूचे आरोग्य दीर्घकाळ सुरक्षित ठेवणे शक्य होते.