मायग्रेन असणाऱ्या व्यक्तींनी कोणती काळजी घ्यावी?
याबाबत माहिती देताना डॉ. धिरज आंडे सांगतात की, मायग्रेन म्हणजे अनेकांना वाटत की, फक्त तीव्र डोके दुखी असणे. पण, तसे नाही मायग्रेनमध्ये पोटाचे विकार, मानसिक त्रास, मळमळ होणे यासारखे त्रास होऊ शकतात. पावसाळ्यात दमट वातावरण असल्यामुळे पचनशक्ती मंदावते. त्याचबरोबर विविध आजार जोर करतात. मायग्रेनचा त्रास देखील वाढू शकतो. तो त्रास टाळण्यासाठी दररोज गरम पाणी प्यावे. आहारात तेलकट पदार्थ टाळावे. पावसाळ्यात हलका आहार घेणे सुरू केल्यास मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते, असे ते सांगतात.
advertisement
Aloo Bukhara Benefits: पचनशक्तीसाठी अतिशय फायदेशीर, आलू बुखाराचे हे गुणकारी फायदे माहितीये का?
दुपारची झोप टाळावी
पुढे ते सांगतात की, त्याचबरोबर दुपारी जेवण केल्यानंतर झोप घेणे टाळावे. त्यामुळे पित्ताचा त्रास होऊन मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. तसेच वातावरणात गारवा आहे म्हणून अनेकजण चहा घेतात. अती प्रमाणात चहा पिल्याने सुद्धा मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. भरपूर पाणी पिणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने सुद्धा तीव्र डोके दुखी होऊ शकते.
लोकरीचे कपडे वापरावे
पावसाळ्यात अनेकवेळा वातावरणात गारवा पसरतो. अशावेळी लोकरीचे कपडे परिधान करणे सोईचे राहील. त्यामुळे शरीरातील उष्मा संतुलित राहील आणि मायग्रेनचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर पाऊस सुरू असताना बाहेर पडत असाल तर डोके ओले होणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी छत्री, रेनकोट वापरा. डोके ओले असल्यास देखील मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, असे डॉक्टर सांगतात.
थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणे टाळा
पावसाळ्यात सगळीकडे हिरवेगार वातावरण असल्याने अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. त्याचबरोबर घाट परिसरात देखील जातात. अशावेळी आपल्या कानात थंड हवेचा दाब वाढतो आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे फिरायला जाणे सुद्धा टाळायला पाहिजे. तसेच नियमित प्राणायाम आणि व्यायाम केल्यास देखील मायग्रेनचा त्रास कमी करता येऊ शकतो, असे डॉ. धिरज आंडे सांगतात.