तज्ज्ञांचं मत आहे की, साखरेमध्ये जास्त कॅलरीज असतात पण, त्या अजिबात पोषक नसतात. जास्त साखर खाल्ल्यास वजन वाढतं. कारण, साखरेतील अतिरिक्त कॅलरीज शरीरात फॅट्सच्या रूपात जमा होतात. या व्यतिरिक्त, साखरेमुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबेटिसचा धोका वाढतो. प्रदीर्घकाळ साखरेचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्याने हार्ट डिसिजेसचा धोका वाढू शकतो. कारण, त्यामुळे ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढते.
advertisement
कोल्ड्रिंक्स, बिस्किटे आणि केक यांसारख्या खाद्यपदार्थांमधून आपल्या शरीरात साखर जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार, आपण आपल्या दैनंदिन एकूण कॅलरीज सेवनापैकी 10 टक्क्यांपेक्षा जास्त साखरेचा वापर करू नये. साखरेचं सेवन 5 टक्क्यांपर्यंत मर्यादित असलं पाहिजे. जर तुम्ही दररोज 2000 कॅलरीज घेत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही दररोज 200 कॅलरीजपेक्षा जास्त साखर खाऊ नये.
1 ग्रॅम साखरेमध्ये सुमारे चार कॅलरीज असतात. सामान्य व्यक्ती निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीसाठी दररोज सुमारे 10 चमचे साखर खाऊ शकते. पण, जे लोक डेस्क जॉब करतात किंवा कमी कष्टाचे काम करतात त्यांनी सहा चमच्यांपेक्षा जास्त साखर खाऊ नये. डायबेटिसच्या रुग्णांनी साखरेचं सेवन पूर्णपणे बंद केलं पाहिजे.
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार (एएचए), निरोगी व्यक्तीने दररोज 36 ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये. पुरुषांनी नऊ चमच्यांपेक्षा जास्त आणि महिलांनी सहा चमच्यांपेक्षा जास्त साखर खाऊ नये. फळं आणि दुधात आढळणारी नैसर्गिक साखर शरीरासाठी घातक ठरत नाही.