हिवाळ्यात डोळे का कोरडे पडतात ?
थंडीमुळे हवेतील धुकं आणि सूक्ष्म कणांचं प्रमाण वाढते. यासोबतच आर्द्रता कमी झाल्यामुळे आणि थंड वाऱ्यांमुळे डोळ्यांत कोरडेपणा आणि जळजळ वाढते. ज्या लोकांना आधीपासूनच डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी हिवाळा हा डोकेदुखीचा ठरतो. त्याच बरोबर अँटी-हिस्टामाईन औषधे हिवाळ्यात घेतल्यास डोळ्यांतील कोरडेपणा वाढू शकतो. डोळे लाल होणे, त्यातून सतत पाणी येणं, डोळ्यांत चुरचुर जाणवणं, अंधुक दिसणे, डोळे जड होणे आणि थकवा येणे असा त्रास होऊ शकतो. ज्या व्यक्तीचं मोतिबिंदूचं ऑपरेशन झालं असेल किंवा ज्या व्यक्ती कॉन्टक्ट लेन्स वापरतात त्यांना डोळे कोरडे पडण्याच्या त्रासाचा धोका हा अधिक असतो.
advertisement
उपाय :
जर तुम्हाला डोळ्यांचा आजार असेल तर नियमितपणे आयड्रॉप वापरत राहा. तरीही त्रास दूर होत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळोवेळी स्वच्छ पाण्याने डोळे धुत रहा. घरात एअर प्युरिफायर आणि रूम ह्युमिडिफायर वापरा. प्रदूषण आणि ॲलर्जीचा त्रास टाळण्यासाठी गॉगल वापरा. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. मोबाईल, टिव्ही कमी पाहा जेणेकरून तुमचा स्क्रीन टाईम कमी झाल्याने डोळ्यांना आराम मिळू शकेल. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम टाळण्यासाठी डोळ्यांचे व्यायाम करा.
काय करावे आणि काय करू नये :
डोळा हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा अवयव आहे. मात्र दुर्देवाने आपण योग्य त्या पद्धतीने डोळ्यांची काळजी घेत नाही. त्यामुळे तुम्हाला जर डोळ्याचा काही त्रास असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. केमिस्टकडे जाऊन ते सांगतील ते आय ड्रॉप किंवा तुमच्या मनानुसार डोळ्यात कोणत्याही प्रकारची औषधं टाकू नका. डोळ्यांना आराम मिळावा म्हणून अनेक जण डोळ्यात गुलाबपाणी टाकण्याचा सल्ला देतात. मात्र असं करू नका. कोणत्याही प्रकारचा बाम वापरू नका. यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांचं कोणतंही औषध घेऊ नका. काही उत्पादनांमध्ये नैसर्गिक स्टिरॉइड्स असू शकतात जे तात्काळ आराम देऊ शकतात परंतु काचबिंदू किंवा मोतीबिंदू सारख्या आजारांना ते कारणीभूत ठरू शकतात.