बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या लहान-मोठ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. पहिल्या एक ते दोन वर्षांमध्ये बाळाच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं देखील असतं. यासाठी घरातील वडीलधारी मंडळी बाळाच्या आईला वेगवेगळे सल्ले देतात. त्यामध्ये उशीच्या वापराचाही सल्ला असतो. अनेकदा घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती सांगतात की, लहान बाळाला झोपवताना त्याच्या डोक्याखाली मोहरीची उशी ठेवावी. मोहरीची उशी तयार करणे शक्य नसेल तर त्याच्या डोक्याखाली एखादी पातळ उशी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे बाळाच्या डोक्याचा आकार योग्य राहतो आणि त्याला चांगली झोपही येते, असं म्हटलं जातं. पण, याचे फायदे आणि तोटे अनेक पालकांना माहिती नसतात.
advertisement
मुलींना कमी वयातच येतेय पहिली मासिक पाळी; डॉक्टरांनी सांगितलेल्या कारणाने काळजी वाढवली
लहान बाळांच्या प्रसिद्ध डॉक्टर माधवी भारद्वाज यांनी याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की, बाळांच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज असते. बाळाच्या डोक्याखाली उशी ठेवण्याची गरज नसते. बाळाच्या डोक्याखाली उशी ठेवल्याने किंवा न ठेवल्याने त्याच्या डोक्याच्या आकारावर काहीही परिणाम होत नाही.
आपण मोठे होतो तसतसं आपलं डोकं आणि मानेमधील अंतर वाढत जातं. या अंतराच्या खाली आपण एक उशी ठेवतो जेणेकरून आपल्याला आरामात झोप घेता येईल. पण, बाळांची मान आणि डोक्यात प्रौढांप्रमाणे अंतर नसतं. त्यामुळे त्यांना उशीची गरज नसते.
डॉक्टर भारद्वाज यांच्या मते, किमान एक ते दीड वर्षे वयाच्या बाळासाठी उशी वापरू नये. बाळ दिवसातून 18 ते 20 तास झोपते. त्यामुळे एवढा वेळ त्याच्या डोक्याखाली उशी ठेवल्याने त्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाळाला उशीशिवाय झोपवावं आणि वेळोवेळी त्याच्या झोपण्याची स्थिती बदलावी.
