बिकानेर : डाळभात आणि लोणचं हे कॉम्बिनेशन अतिशय लोकप्रिय आहे. त्यात जर कैरीचं लोणचं मिळालं तर काही विचारायलाच नको. पण काहीजणांना आवळ्याचं लोणचं आवडतं, तर काहीजणांना मिरचीचं लोणचं खायला प्रचंड आवडतं.
करवंद हे फळ अतिशय गुणकारी आहे. ते औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतं. आयुर्वेदिक डॉक्टर निधी मिश्रा सांगतात की, करवंदात व्हिटॅमिन सी, बी आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतात. शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत आवश्यक असतं.
advertisement
शिवाय करवंद पोटासाठीही फायदेशीर ठरतं. यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. त्याचबरोबर ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठीही करवंद खाण्याचा सल्ला दिला जातो. करवंदांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ते उत्तम असतं. आरोग्याला एवढे फायदे मिळत असतील तर करवंदाचं लोणचं खायला हरकत नाही, पाहूया रेसिपी.
सर्वात आधी करवंद स्वच्छ धुवून घ्यावे. मग त्याचे काप करून बिया काढून टाकाव्या. आता हिरव्या मिरच्या बारीक चिरून फोडणीची तयारी करावी. एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिऱ्याची फोडणी तडतडू द्यावी, वरून हिंग घालावं. हिंगाचा वास दरवळला की बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या लालसर होईपर्यंत परतून घ्याव्या. नंतर त्यात हळद, मीठ, धनेपूड घालून मिक्स करावं. मिश्रण एकजीव झालं की, त्यात करवंदाच्या फोडी घालून थोडावेळ झाकून ठेवा. आता साखर घालून मिश्रण पुन्हा एकजीव होऊद्या. पाकास आलं की, करवंदाचं चटपटीत लोणचं खायला तयार असेल.
