गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात घरगुती उत्पादने, पारंपरिक कपडे, हाताने बनवलेली ज्वेलरी, डेकोरेशन आणि अनेक आकर्षक वस्तू एकाच छताखाली पाहायला मिळत आहेत. महिला उद्योजिकांनी स्वतः तयार केलेली उत्पादने, स्थानिकतेचा सुगंध आणि घरगुती गुणवत्तेचा अनुभव हे या एक्झिबिशनचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
advertisement
साड्यांच्या विभागात पैठणी, महेश्वरी, बांधणी, डोळा सिल्क, हाथी मोर अशा अनेक प्रकारांच्या पारंपरिक साड्या उपलब्ध असून, त्यांची किंमत 850 पासून 5000 रुपयांपर्यंत आहे. पारंपरिक ज्वेलरीसाठी 100 रुपयांपासून 1200 रुपयांपर्यंत विविध आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये नथ, बांगड्या, झुमके, हार आणि इतर सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे.
गणपती डेकोरेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कलात्मक साहित्य येथे 200 रुपयांपासून मिळू शकते. होम डेकॉर वस्तू 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत आहेत, ज्यामध्ये पारंपरिक पणत्या, वॉल हँगिंग्ज, तोरण आणि शोपीसेसचा समावेश आहे. कॉस्मेटिक वस्तूसाठी 150 ते 500 रुपयांपर्यंत आकर्षक पर्याय ठेवण्यात आले आहेत.
खवय्यांसाठी देखील इथे खास विभाग आहे. लाडू, चकल्या, गूळ, फरसाण, शेव, चिवडा असे अनेक पारंपरिक आणि चविष्ट खाद्यपदार्थ येथे उपलब्ध आहेत. गणपतीच्या फराळाची सुरुवात याच प्रदर्शनातून केली तर त्याला घरगुती चव आणि दर्जाही मिळणार यात शंका नाही.
‘मोरया एक्झिबिशन’ हे प्रदर्शन खरेदीसोबतच महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणारे एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे. येत्या सणासाठी खास खरेदी करायची असेल तर हे प्रदर्शन नक्कीच भेट देण्याजोगं ठिकाण आहे.





