मुख दुर्गंधीची समस्या तुम्हालाही जाणवत असेल तर ही माहिती नक्की वाचा. तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्तता कशी मिळवायची यासाठी योगगुरू हंसा योगेंद्र यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. मुख दुर्गंधी ही केवळ तोंडाची समस्या नाही, ही समस्या आपल्या पचनसंस्थेशी, काही दैनंदिन सवयींशी आणि जीवनशैलीशी देखील संबंधित आहे. यासाठी काही सोपे आणि लगेच करता येतील असे उपाय त्यांनी सुचवले आहेत.
advertisement
त्रिफळा पाण्यानं तोंड स्वच्छ धुवा - त्रिफळा म्हणजेच आवळा, हरड आणि बहेडा यांचं मिश्रण शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी आणि हिरड्यांची जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी त्रिफळा रात्रभर पाण्यात भिजवा, सकाळी गाळून घ्या आणि माउथवॉश म्हणून वापरा. यामुळे पचन सुधारतं आणि तोंडाची दुर्गंधी पूर्णपणे जाते.
बडीशेप किंवा जिरं खाणं - प्रत्येक जेवणानंतर बडीशेप किंवा भाजलेलं जिरं चावण्याचा सल्ला योगगुरूंनी दिला आहे. या बियांमुळे पचनाला मदत होते, गॅस आणि अपचनही कमी होतं आणि तोंड ताजंतवानं राहतं. बडीशेप, धणे आणि जिरे वापरून बनवलेला हर्बल चहा देखील पिऊ शकता. आतून दुर्गंधी दूर करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.
जीभ स्वच्छ करणं - दात घासले जातात पण जिभेवर जमा होणारी घाण आणि बॅक्टेरियाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. हे तोंडाच्या दुर्गंधीचं सर्वात मोठं कारण आहे. म्हणून, दररोज तांबं किंवा स्टीलच्या टंग क्लीनरनं जीभ स्वच्छ करा. तसेच, डेंटल फ्लॉस आणि इंटरडेंटल ब्रशिंगनं दातांमधील भाग स्वच्छ करा.
भरपूर पाणी प्या - तोंड कोरडं पडल्यानं तोंडाची दुर्गंधी वाढू शकते. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी किंवा तुळस असलेलं कोमट पाणी पिणं हा आणखी चांगला पर्याय आहे. तसंच, जास्त चहा आणि कॉफी टाळा, कारण यामुळे तोंड कोरडं होऊ शकतं.
Brain Fog : ब्रेन फॉगवर उपचार शक्य आहेत का ? जाणून घ्या लक्षणं, कारणं, उपचारपद्धती
कापूर आणि लवंगाची वाफ - घशामुळे किंवा सायनसमुळे तोंडात दुर्गंधी जाणवत असेल, तर कापूर आणि लवंगाची वाफ घेणं फायदेशीर आहे. यामुळे नाक आणि घसा स्वच्छ राहतो आणि श्लेष्मा कमी होतो, ज्यामुळे श्वास ताजा राहतो, दुर्गंधी जाणवत नाही.
कधीकधी तोंडाच्या दुर्गंधीचं कारण तोंड नसून नाकातील कोरडेपणा आणि घाण असू शकते. यावर उपचार करण्यासाठी, नारळाचं तेल किंवा गायीचं तूप हलकं गरम करून ते नाकात लावा आणि खोल श्वास घ्या. यामुळे नाक ओलसर राहील आणि दुर्गंधी कमी होईल.
मुख दुर्गंधी हा आजार नाही, तर तुमच्या शरीराकडून येणारा एक संकेत आहे, तुमची जीवनशैली सुधारण्याची आवश्यकता आहे असा संकेत यातून दिला जातो असं योगगुरू म्हणतात. योग्य आहार, स्वच्छता आणि थोडी काळजी घेतली तर ही समस्या दूर होऊ शकते.