विविध सण व उत्सवांच्या काळात उपवास करण्याची प्रथा भारतात आहे. उद्यापासून (३ ऑक्टोबर) सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्राच्या काळात अनेक स्त्रिया व पुरुष नऊ दिवस उपवास करतात. या काळात साबुदाणा, वरई, राजगिरा, बटाटे यांपासून तयार केलेल्या पदार्थांचा फराळ केला जातो. विशेषतः साबुदाण्याची खिचडी जवळपास रोज खाल्ली जाते. त्यासाठी साबुदाणा चांगल्या प्रतीचा आहे की नाही, हे तपासून घेतलं पाहिजे. आजकाल बाजारात बनावट साबुदाणाही विक्रीसाठी उपलब्ध असतो. अशा साबुदाण्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. म्हणूनच खरा साबुदाणा कसा ओळखावा, याच्या काही टिप्स जाणून घेऊ या.
advertisement
कॅल्शियम, सल्फ्युरिक अॅसिड, सोडियम हायपोक्लोराइड, ब्लीचिंग एजंट आणि अनेक रसायनांचा वापर करून बनावट साबुदाणा तयार केला जातो. हा साबुदाणा हुबेहूब खऱ्या साबुदाण्यासारखा दिसतो. त्यामुळे ग्राहक पटकन ओळखू शकत नाहीत. हा बनावट साबुदाणा आरोग्यासाठी हानिकारक असतो. तो खाणारे आजारी पडू शकतात. म्हणूनच बनावट साबुदाणा ओळखता येणं गरजेचं असतं. त्यासाठी काही सोप्या टिप्स वापरता येऊ शकतात.
नवरात्रीचे उपवास करताना तुम्हीही या गोष्टी करता? फायद्याच्या जागी होईल नुकसान
साबुदाणा खरेदी करण्याआधी या टिप्सचा वापर करून तो खरा आहे की बनावट आहे, हे ओळखलं तर फसवणूक होणार नाही.
- साबुदाणा पाण्यात टाकून त्याची चाचणी घेता येते. तो पाण्यात टाकला की लगेचच पाण्यात स्टार्च दिसू लागतं व साबुदाणाही थोडा मऊ पडतो व लुसलुशीत होऊ लागतो; मात्र तो साबुदाणा बनावट असेल तर तो पाण्यात टाकल्यावर लगेचच मऊ पडायला लागणार नाही. तो आहे तसाच राहील.
- साबुदाणा चांगला आहे का हे तपासण्यासाठी तो चावूनही पाहता येतो. साबुदाणा चावला की त्याची चव तांदळासारखी लागते आणि दातांवर चिकट थर जाणवतो. असा साबुदाणा चांगला असतो. साबुदाणा बनावट असेल तर तो चावल्यावर दात करकरतील. दातांवर चिकट थर जाणवणार नाही.
- साबुदाण्याची पारख करण्यासाठी तो भाजणं हा देखील एक उपाय आहे. साबुदाणा भाजला की तो फुगतो व त्याची लाही तयार होते. बनावट साबुदाणा मात्र भाजला की जळून जातो. त्याची राख होते.
साबुदाण्यामुळे पित्त होतं म्हणून अनेक जण साबुदाण्याचा वापर कमी करतात; पण उपवास म्हटलं की साबुदाणा कधी ना कधी खाल्ला जातोच. मग साबुदाणा योग्य प्रतीचा आहे का, हे पाहणंही महत्त्वाचं असतं. त्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करून स्वतःची फसवणूक टाळू शकता.