कोणता रूम हीटर आहे सर्वात उत्तम?
ऑइल-फिल्ड हीटर
ऑइल-फिल्ड हीटरमध्ये धातूच्या फिन्सच्या आत विशेष तेल भरलेले असते, जे आत बसवलेला इलेक्ट्रिक एलिमेंट गरम करतो. एकदा गरम झाल्यानंतर हा हीटर दीर्घकाळ खोलीत समान उब टिकवून ठेवतो. म्हणूनच रात्रभर वापरण्यासाठी हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. हा हीटर आवाज न करता काम करतो आणि हवा कोरडी करत नाही, त्यामुळे अॅलर्जी किंवा श्वसनाच्या समस्या असणाऱ्यांसाठीही तो चांगला असतो. मात्र याला गरम होण्यासाठी 15–20 मिनिटे लागतात. तसेच तो थोडा जड आणि महाग असतो.
advertisement
रॉड किंवा फिलामेंट हीटर
रॉड किंवा फिलामेंट हीटर इन्फ्रारेड तंत्रज्ञानावर काम करतात आणि हवा गरम न करता समोर असलेल्या वस्तू आणि शरीराला थेट उष्णता देतात. त्यामुळे हे हीटर लगेच उब देतात आणि पायांना किंवा शरीराला पटकन आराम मिळतो. हे हलके, पोर्टेबल आणि स्वस्त असतात. पण संपूर्ण खोली गरम करू शकत नाहीत. यांचा एलिमेंट खूप जास्त गरम होतो, त्यामुळे लहान मुले आणि पाळीव प्राण्यांसाठी धोका निर्माण होऊ शकतो.
ब्लोअर हीटर
ब्लोअर हीटरमध्ये फॅनच्या मदतीने गरम हवा खोलीत पसरवली जाते, त्यामुळे कमी वेळेत संपूर्ण खोली गरम होते. हे लहान खोल्यांसाठी योग्य आणि स्वस्त असतात. मात्र फॅनचा आवाज त्रासदायक ठरू शकतो आणि सतत वापरल्याने हवा कोरडी होते, ज्यामुळे त्वचा आणि श्वसनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यांची वीजखपतही जास्त असते, त्यामुळे हे रात्रभर किंवा देखरेखीशिवाय वापरू नयेत.
या सेफ्टी टिप्स प्रत्येक हीटरसाठी आवश्यक
कोणताही हीटर पडदे, पलंग आणि फर्निचरपासून दूर ठेवा. खोलीत वेंटिलेशन असणे गरजेचे आहे आणि हीटरजवळ पाण्याचे भांडे ठेवल्यास ओलावा टिकून राहतो. लहान मुले आणि पाळीव प्राणी यांच्यापासून योग्य अंतर ठेवा.
जर तुम्हाला रात्रभर सुरक्षित उब हवी असेल तर ऑइल-फिल्ड हीटर निवडा. त्वरित उष्णतेसाठी रॉड हीटर आणि कमी वेळ वापरासाठी ब्लोअर हीटर हे चांगले पर्याय आहेत. आपल्या गरजेनुसार योग्य हीटर निवडणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
