उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणारी बीट कोशिंबीर, कमी वेळेत बनवा पौष्टिक रेसिपी, सोप्या पद्धतीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
बीटापासून बनणारी कोशिंबीर ही चविष्ट आणि पौष्टिक पर्याय ठरू शकते. विशेष म्हणजे ही कोशिंबीर अगदी 15 ते 20 मिनिटांत तयार होते.
पुणे : आरोग्यासाठी उपयुक्त असलेला बीट अनेकदा लोक टाळतात. काहींना त्याची चव आवडत नाही तर काहींना तो खायला कंटाळा येतो. मात्र बीटापासून बनणारी कोशिंबीर ही चविष्ट आणि पौष्टिक पर्याय ठरू शकते. विशेष म्हणजे ही कोशिंबीर अगदी 15 ते 20 मिनिटांत तयार होते. बीटामध्ये आयर्न, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तवाढीस मदत होते, शरीरातील थकवा कमी होतो आणि पचनशक्ती सुधारते. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठीही बीट उपयोगी मानला जातो. आज याची रेसिपी बनवणार आहोत.
बीटापासून तयार होणारी कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बीट, तेल, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, साखर, शेंगदाणा, कोथिंबीर, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.
कोशिंबीर कृती
सुरुवातीला बीट स्वच्छ धुवून त्याचा देठाकडील भाग कापून घ्या. त्यानंतर बीटाची साल काढून बारीक जाळीच्या किसणीने किसून घ्यावी. किसल्यानंतर त्यातील पाणी नीट पिळून काढून किस मोकळा करून घ्या. आता फोडणी करून घ्या. एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून फोडणी द्यावी. फोडणी पूर्णपणे थंड होऊ द्या.
advertisement
यानंतर बीटाच्या किसामध्ये मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा कूट घालून चांगले मिक्स करावे. थोडी कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करावे. त्यात दोन टेबलस्पून सायीचे दही घालून एकजीव करावे. शेवटी गार झालेली फोडणी घालून हलक्या हाताने मिक्स करावे. वरून कोथिंबीर घालून सजवावे. ही बीट कोशिंबीर तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा नुसती खायला देखील ही चविष्ट लागते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 1:02 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणारी बीट कोशिंबीर, कमी वेळेत बनवा पौष्टिक रेसिपी, सोप्या पद्धतीचा Video






