छत्रपती संभाजीनगर : आता देशभरात नवरात्रोत्सव आनंदात साजरा होईल. रात्रीच्या वेळी गरब्याचा उत्साह असेलच, शिवाय देवीच्या आगमानामुळे दिवसही छान प्रसन्न जातील. दरवर्षी नवरात्रीला अनेक घरांमध्ये घटस्थापना होते. 9 दिवस उपवास पाळले जातात.
अनेकजण दिवस-दिवसभर निर्जळी कडक उपवास करतात, तर काहीजण उपवासाचे पदार्थ खातात. उपवासाचा पदार्थ म्हटलं की, डोळ्यासमोर येते साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, वेफर्स, भगर, इत्यादी. काहीजणांना नेमकं उपवासाच्या दिवशीच डोळ्यासमोर आवडीचे पदार्थ दिसू लागतात आणि मग भूक काही आवरत नाही. तुम्हाला माहितीये का, उपवासाला पिझ्झादेखील चालतो. हा नेमका कोणता पिझ्झा आहे आणि तो कसा बनवायचा, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
उपवासाच्या पिझ्झासाठी लागणारे साहित्य:
बटाट्याचे उभे चिरलेले काप, लाल तिखट, तूप, काळी द्राक्ष, इनो, भगर, साबुदाण्याचं पीठ, चीज, बटाट्याचा कीस, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची (तिखट नसलेली), सैंधव मीठ, इत्यादी.
पिझ्झाची कृती:
सर्वात आधी तव्यावर बटाट्याचे काप घ्यायचे. 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून त्यात गरजेनुसार मीठ घालायचं. दुसरीकडे, थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ घालून पीठ फेटून घ्या. ते जास्त पातळ किंवा घट्ट व्हायला नको. मग हे पीठ बटाट्याच्या कापांवर गालून 10 मिनिटं तसंच राहूद्या.
सॉस तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये थोडं तूप घेऊन त्यात तिखट घालायचं. मग बटाट्याचा किस चीज आणि पाणी घालून पातळ करून घ्यायचं. ते सॉसमध्ये घेऊन चांगलं शिजू द्यावं. त्यात थोडं मीठ, हिरवी मिरची आणि पनीर घालून फ्राय करून घ्यावं.
आता बटाट्याचे काप आणि पिठाचा जो बेस केला आहे तो उलट करून पलटायचा. त्यावर आपण जो सॉस केला आहे तो घालून वर टॉपिंगसाठी पनीर आणि हिरवी मिरची वापरायची. काळ्या द्राक्ष्यांचे काप आणि चीजही घालायचं. चीज मेल्ट झालं की, पिझ्झा एका डिशमध्ये काढून घ्यायचा. अशा पद्धतीनं उपवासाचा पिझ्झा तयार आहे. चीज दुधापासून तयार होत असल्यानं ते उपवासाला चालतं, असं म्हणतात. त्यामुळे आपण नवरात्रीत हा पिझ्झा नक्कीच ट्राय करू शकता.